
Solapur News जिल्ह्यातील उसाचा हंगाम (Sugarcane Season) संपला, तरीही तब्बल २६ साखर कारखान्यांनी बेस रिकव्हरीनुसारची ४८८.७० कोटी रुपयांची बिले (Sugarcane Payment) अद्यापही न काढल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हंगाम संपून एक ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी बिले देण्यास कारखान्यांकडून चालढकल केली जात असल्याचे चित्र आहे.
यंदा जिल्ह्यात ३७ कारखान्यांनी एक कोटी ८० लाख ६३ हजार ३८५ टन उसाचे गाळप केले. त्याचे बेस रिकव्हरी १०.२५ टक्क्यांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर ३६६६.७० कोटी रुपये जमा झाले आहेत. तरीही ऊसबिलाची थकित रक्कम मोठी आहे. बेस रिकव्हरीनुसारची बिले अजून मिळाली नाहीत, तर अंतिम साखर उताऱ्याप्रमाणे बिले केव्हा मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
काही कारखान्यांनी तातडीने बिले दिली. तथापि, बहुतांश कारखान्यांनी बिले देण्यास विलंब लावल्याने शेतकऱ्यांना हक्काच्या पैशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. उसाच्या बिलावरच शेतकरी खऱ्या अर्थाने आपले आर्थिक नियोजन करीत असतो.
उसाचा वेळेत मोबदला मिळत नसेल तर अवकाळीने गाठलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांची देखभाल, खरीपपूर्व मशागत, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजारपण याचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ऊसबिले मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कारखान्यांना लेखी पत्रे दिली आहेत. तरीही कारखानदारांना घाम फुटेनासा झाला आहे. काही कारखान्यांमध्ये कामगारांच्या थकित वेतनाचा मुद्दाही कळीचा बनला आहे.
काही कारखान्यांनी ऊसबिलाची नेमकी आकडेवारी दाखवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे न मिळता कारखान्यांची थकित रक्कम कमी दिसत आहे.
आरआरसी कारवाई होईल या भीतीने कारखाने थकित रक्कम कमी दाखवत आहेत. तर दुसरीकडे साखर आयुक्तालय आरआरसी कारवाई करत नाहीत. पण आम्ही गप्प बसणार नाही. लवकरच बेमुदत धरणे आंदोलन करू.
- विजय रणदिवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कारखानानिहाय ३० एप्रिलपर्यंतची थकित एफआरपी
कारखाना-थकित एफआरपी (कोटी रुपये)
सिद्धेश्वर - ९.५८
संत दामाजी-१.१९
मकाई-२६.३२
संत कूर्मदास-८.००
लोकनेते-२६.४१
सासवड माळी-२०.३९
लोकमंगल बिबीदारफळ -३.११
लोकमंगल भंडारकवठे-२.४७
सिद्धनाथ-३७.०९
जकाराया-४.३४
इंद्रेश्वर-१४.८२
भैरवनाथ विहाळ-२३.२७
भैरवनाथ लवंगी-२३.१५
युटोपियन-१९.८५
मातोश्री-२२.७९
भैरवनाथ आलेगाव-२९.३९
ओंकार-०.५१
विठ्ठल रिफाइंड-८१.६४
आष्टी शुगर-१४.९९
भीमा-५१.९६
सहकार शिरोमणी-४४.२५
सीताराम महाराज-२.८४
धाराशिव सांगोला-४.८७
श्री शंकर-९.९६
आवताडे शुगर्स-२.५४
येडेश्वरी-२.६७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.