
मनोर : पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या ४५ गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांना एमएमआरडीएच्या (MMRDA) जलवाहिनीमधून जलजोडणी दिली जाणार आहे.
थेट पाणीपुरवठा होणार असल्याने पाणी शुद्धीकरण आणि वीज बिलाच्या रकमेत बचत होणार आहेत; तर दुसरीकडे एमएमआरडीएची मंजुरी न मिळाल्याने ३१ गावे नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा परिषदेतर्फे जलजीवन मिशन अंतर्गत महामार्गालगतच्या ७६ गावांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. या गावांमध्ये पुरेशा प्रमाणात जलस्रोत उपलब्ध नसल्याने एमएमआरडीएच्या जलवाहिनींमधून जलजोडणी देण्याची मागणी जिल्हा परिषदेने केली होती.
एमएमआरडीए राबवत असलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. ही जलवाहिनी या ७६ गावांच्या हद्दीतून जाते. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्याने या जलवाहिनीतून नळजोडणी देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
या ७६ गावांची दररोजची पाण्याची मागणी २२.३३ दशलक्ष लिटर असल्याचे सांगत सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यासह जल जोडणी देण्याची मागणी जिल्हा परिषदेने एमएमआरडीएकडे केली होती.
जिल्हा परिषदेच्या प्रस्तावानुसार एमएमआरडीएने ७६ पैकी ४५ गावांना जोडणी देण्यास मान्यता दिली आहे; तर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यास उर्वरित ३१ गावांसाठी जलजोडणी देण्यात येईल, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले आहेत.
एमएमआरडीएच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पालघर जिल्ह्यातील गावांसाठी १५ दशलक्ष लिटर पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ७६ गावांसाठी २५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता, पण एमएमआरडीएकडून १५ दशलक्ष लिटर पाणी साठ्याअंतर्गत ४५ गावांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
उर्वरित गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी स्थानिक स्तरावर पाण्याचे स्रोत वापरले जाणार आहेत.
- भानुदास पालवे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सध्या १५ दशलक्ष लिटर पाणी साठ्याअंतर्गत ४५ गावांना जलजोडणीसाठी मंजुरी दिली आहे. अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यास उर्वरित गावांसाठी जलजोडणी देण्यात येईल.
- हनुमंत सोनावणे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.