
Malegaon Sugar Factory माळेगाव, ता. बारामती ः केंद्र सरकारच्या धोरणानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा (Malegaon Sugar Factory) व्याजासह सुमारे ३१९ कोटी रुपयांचा प्राप्तिकर (Income Tax) माफ झाला आहे. या प्राप्तिकरापोटी १९९२ पासून आजवर भरलेली ५ कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम व्याजासह परत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणामुळे करमाफीबद्दल सभासद शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एफआरपीपेक्षा जादा ऊस दराला प्राप्तिकरातून वगळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित सहकारी साखर कारखाने न्यायालयात लढा देत होते. त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील कारखानदारांनी वरील समस्येविरुद्ध संघर्ष केला होता. त्या लढ्याला १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम स्वरूप आले. या प्रक्रियेत सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे.
देशात १० हजार कोटीपैकी तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर फक्त महाराष्ट्रातून जाणार होता. त्यातून आता महाराष्ट्रातील सहकारी कारखानदारांची सुटका झाली आहे.
उसाला एफआरपी किंवा एसएमपीपेक्षा जास्त दिलेला दर कारखान्यांचा नफा समजून त्यावर प्राप्तिकर लावला होता. तो कर आता पूर्णतः माफ झाल्याने कारखानदारांच्या डोक्यावरील टांगती तलवार बाजूला गेली आहे, अशी माहिती भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज तावरे यांनी दिली.
तावरे म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून जादा दरावरील प्राप्तिकर मागे घेण्याची मागणी साखर उद्योगाची होती, यातून आता सुटका होईल.
केंद्राने अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी विशेष करून सहकारी साखर उद्योगासाठी घेतलेला निर्णय निश्चितपणे कौतुकास्पद आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या काळात सहकारी साखर कारखानदारी चालणे अतिशय मुश्कील झाले आहे. सहकारी साखर कारखानदारांसाठी प्राप्तिकराचा सकारात्मक निर्णयाचा फायदा देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे.’’
पुणे बाजार समितीचे माजी सभापती व भाजप नेते दिलीप खैरे म्हणाले, ‘‘एफआरपीपेक्षा जादा ऊसदराला प्राप्तिकरातून वगळणारा निर्णय खरेतर साखर उद्योगाच्या दृष्टीने ऊर्जितावस्था आणणारा आहे.
ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखानदारांना यापुढे अनावश्यक आर्थिक आणि कायदेशीर त्रास सहन करावा लागणार नाही. सहकारावर आधारित विकास ही संकल्पना इथून पुढे दृढ होण्यास मदत होईल.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.