
नाशिक : १९६० पूर्वी महाराष्ट्रातील द्राक्षशेती (Grape Farming) पारंपरिक पद्धतीची होती. त्या वेळी परदेशात द्राक्ष शेतीमध्ये अनेक स्थित्यंतरे घडत होती. दरम्यान, द्राक्ष बागायतदारांना (Grape Farmer) एकाच व्यासपीठावर आणून तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी कै. अण्णासाहेब शेंबेकर यांनी पुढाकार घेतला.
तत्कालीन कृषिमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने २३ डिसेंबर १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ’ स्थापन झाला. संघटनात्मक पातळीवर एकत्र येऊन सातत्यपूर्ण कामकाज, नावीन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान विस्तार या रचनात्मक कामामुळे संघाचे रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादक सभासद संघाशी जाऊन ही सभासद संख्या ३२,५०० च्यावर गेली आहे.
‘वाढेल वेल द्राक्षाची, होईल उन्नती देशाची’ हे ब्रीद घेऊन संघाने ६२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पहिले अध्यक्ष अण्णासाहेब शेंबेकर यांनी रावसाहेब बोरावके यांच्या सोबतीने संघाचा विस्तार केला. त्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे मोलाचे योगदान लाभले. सुरुवातीला निवडक ६० द्राक्ष उत्पादक एकत्र आले. त्या वेळी द्राक्षाचे क्षेत्र अवघे ८०० हेक्टरच्या जवळपास होते. मात्र आजमितीस राज्यातील द्राक्षाचे क्षेत्र ४ लाख ५० हजार हेक्टरवर गेले आहे.
तर सभासद संख्या निव्वळ ६० असताना ती आता ३२ हजार ५०० वर गेली आहे. संघाच्या या आदर्श कामकाजाचा अभ्यास करून शोधनिबंधाद्वारे प्रा. निर्मला विखे-वाबळे (नगर) यांनी पीएचडी मिळविली आहे. संघाने शेतकऱ्यांची एकत्र मोट बांधून सांघिक प्रयत्नाद्वारे समृद्धीचा राजमार्गच तयार केला आहे. संघाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन द्राक्ष उत्पादनात क्रांती घडविली आहे. यामध्ये फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. जी. एस. चिमा, डॉ. के. एल. चढ्ढा, डॉ. एस. डी. शिखामणी, अ. दाभोळकर, डॉ. जे. एम. खिलारी आदींचा सहभाग मोलाचा ठरला.
संघाची कामे दृष्टिक्षेपात :
- द्राक्ष गुणवत्ता, उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान द्राक्ष बागायतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
- नामवंत शास्त्रज्ञांचे चर्चासत्र, परिसंवादाद्वारे मार्गदर्शन
- माती, पाणी, देठ, खते परीक्षण करून शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन
- पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली या ठिकाणी संघाची स्वतंत्र विभागीय कार्यालये
- सभासदांना ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर खते, औषधे, अत्यावश्यक निविष्ठा आयात करून पुरवठा
- मांजरी (पुणे) येथे संशोधन प्रयोगशाळा व रोपवाटिका
- राज्यभरात २० डेपो कार्यालये कार्यान्वित
संशोधन संस्थेचा दर्जा
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्लीकडून संघाला १ एप्रिल १९८० रोजी ‘संशोधन संस्था’ म्हणून दर्जा मिळाला. त्याद्वारे द्राक्ष पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्पादन व गुणवत्ता सुधारणा, निर्यात प्रक्रिया या बाबींवर संघाने भरीव काम उभे केले. त्यामुळे भारतीय द्राक्षाच्या निर्यातीतील वाढीत संघाचा मोलाचा वाटा राहिला आहे.
द्राक्ष शेती व उत्पादकांचा सर्वागींण विकास व्हावा, यासाठी संघाचे काम आदर्श ठरले आहे. संशोधनात्मक व विकासात्मक कामे हाती घेतल्याने द्राक्ष उत्पादनात वाढ झाली. राज्यात मोठे काम उभे राहिले. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- शिवाजीराव पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.