प्रोत्साहन अनुदानासाठी ४७००, तर धान अनुदानासाठी ५०० कोटी

२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; भाजपला झुकते माप
Paddy
PaddyAgrowon

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० हजार अनुदानासाठी ४ हजार ७०० कोटी, तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांत पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर चर्चा केल्यानंतर त्या मंजूर करण्यात येतील. मागील अर्थसंकल्पात संभाव्य आपत्तीचा विचार करून सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांपोटी देण्यात येणाऱ्या रकमेची मागणी केली नाही.
पुरवणी मागण्यांमध्ये भाजपकडे असलेल्या खात्यांना झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे. गृहविभागासाठी तब्बल १५९३ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित असून, सहकार खात्यासाठी ५ हजार १४५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना आणली. या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोना काळात सरकारची आर्थिक कोंडी झाल्याने हा विषय मागे पडला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे अनुदान वाटप करण्याची घोषणा केली. मात्र यातील अनेक अटींमुळे शेतकरी वंचित होते. पश्चिम महाराष्ट्रात पूर, अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली होती. या शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे शिंदे सरकारने नवी नियमवाली तयार केली. हे अनुदान वाटप करण्यासाठी ४७०० कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित आहे. त्यामुळे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग रिकामी झाला आहे.

Paddy
Azolla: धान पिकामध्ये ॲझोलाचा वापर

पथदिवे थकबाकीचा विषय निकाली
ग्रामविकास विभागासाठी १३०१ कोटींची मागणी प्रस्तावित असून, यात मूलभूत सुविधा आणि विकासकामांसाठी ३३५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच महावितरण कंपनी आणि ग्रामविकास विभागात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी पथदिवे थकबाकीपोटी ९३४ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविकास विभाग आणि महावितरणमध्ये पथदिव्यांच्या बिलांच्या थकबाकीवरून वाद सुरू होता. या बिलांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामविकास विभाग करत होता. मात्र ती झाली नाही. अखेरीस त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यासाठी मागणी केली आहे.

धान खरेदी अनुदानासाठी ५०० कोटी
धान उत्पादन शेतकऱ्यांना देण्यात येणारे धान खरेदी अनुदान महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आले होते. यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात दीर्घ चर्चाही झाली होती. मात्र या प्रक्रियेत त्रुटी असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान यापुढे दिले जाणार नाही. त्याऐवजी प्रतिहेक्टरी मदत करण्याचा सरकारचा विचार असल्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्याचवेळी धानाच्या आधारभूत किमतीपोटी शेतकऱ्यांना ६०० कोटी रुपये वितरित करू, असे सांगितले होते. सत्तांतर होताच २०१९ -२० आणि २०२०-२१ च्या धान खरेदी अनुदानासाठी ५०० कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे.

Paddy
धान उत्पादकांना बोनस, अनुदान तत्काळ देण्याची मागणी

ऊसगाळप व वाहतुकीसाठी १२४ कोटी
यंदा शिल्लक उसाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. ऊस लागवड जास्त झाल्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्‍न निर्माण झाला, त्यामुळे गाळप हंगाम मेअखेरपर्यंत चालला. त्यामुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीत मार्ग काढण्यासाठी ऊस वाहतुकीसाठी ५० किलोमीटरच्या वर पाच रुपये प्रतिकिलोमीटर आणि प्रतिटन २०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. यासाठी १२४ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवासाठी ५०० कोटी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यासाठी विविध कार्यक्रम घेण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

एसटीला एक हजार कोटी विशेष अर्थसाह्य
कोरोना काळात आर्थिक कणा मोडलेल्या एसटी महामंडळाला बळकटी देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे विशेष अर्थसाह्य पुरवणी मागण्यांमध्ये प्रस्तावित आहे. एसटी महामंडळाकडे असलेल्या जुन्या बसेसऐवजी नव्या बस घेण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच थकीत वेतन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी यापोटी एसटीचे चाक रुतले होते. यामध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत प्रोत्साहन अनुदानापोटी १००कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

खातेनिहाय मागण्या
गृह खाते : १५९३ कोटी
सहकार : ५१४५ कोटी
महिला बालकल्याण : १६७२ कोटी
बहुजन कल्याण : २९५ कोटी
वैद्यकीय शिक्षण : २३५ कोटी
पर्यटन : ५५१ कोटी
नियोजन : ५०० कोटी
ग्रामविकास : १३०१ कोटी
अन्न नागरी पुरवठा : ५०८ कोटी

प्रमुख मागण्या
शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान : ४७०० कोटी
पंजाबराव देशमुख व्याज सवलत : ३०० कोटी
धान खरेदी अनुदान : ५०० कोटी
वाहतूक व ऊसगाळप अनुदान : १२४ कोटी
एसटी महामंडळ : एक हजार कोटी
इलेक्ट्रिक वाहन धोरण प्रोत्साहन अनुदान : १०० कोटी
अहमदनगर-बीड-परळी- रेल्वे मार्ग : ३५० कोटी
बीओटीसाठी तफावत निधी : ४४० कोटी
ग्रामविकासासाठी विकास कामे ः ३३५कोटी
ग्रामपंचायत पथदिवे थकबाकी : ९६४ कोटी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव विविध कार्यक्रम : ५००कोटी
रायगड किल्ला व परिसर विकासकामे : ५० कोटी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग : ३६ कोटी
मराठवाडा मुक्ती संग्राम : ७५ कोटी
ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी : १५ कोटी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com