
रत्नागिरी ः कोकणात मोसमी पावसाचे (Ratnagiri Rain) आगमन अनपेक्षितपणे लांबले असले तरीही मागील ४८ दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ५५ टक्के मजल मारली आहे. पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ (Rain Yellow Alert) जारी केला असला तरीही सध्या जिल्ह्यात सरींचा पाऊस पडत आहे. भातशेतीसाठी (Paddy) समाधानकारक स्थिती असून आतापर्यंत ६० टक्के लावण्या पूर्ण झाल्या. जोर ओसरल्यामुळे पाणी नसलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
जूनच्या तीन तारखेपर्यंत जिल्ह्यात मोसमी पाऊस पडेल असा अंदाज होता; मात्र मोसमी पावसाच्या आगमनासाठी जिल्हावासीयांना प्रतीक्षा करावी लागली. परिणामी भात रोपवाटिका तयार करण्याची कामेही उशिराने सुरू झाली. काही शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या आटपून घेतल्या होत्या. पाऊस लांबल्यामुळे ते शेतकरी दुबार पेरणीच्या सावटाखाली होते. १० जूनपासून मोसमी पावसाला आरंभ झाला. पुढील प्रवास अडखळतच होता. जून महिन्यात सरासरीही गाठता आलेली नव्हती. जुलै सुरू झाला आणि मुसळधार पावसाला आरंभ झाला.
पुढील पंधरा दिवसांत सरासरी भरून काढली. त्यामुळे खेड, दापोली, चिपळूण, राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. १ जूनपासून ४८ दिवसांत जिल्ह्यात ५५ टक्के पाऊस झाला. शासकीय निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ३२४६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात जिल्ह्यात १७६८ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात २९५० मिमी तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात १३१३ मिमी नोंदविला आहे. उर्वरित ७५ दिवसांत पावसाची केवळ ४७ टक्के सरासरी वाटचाल शिल्लक राहिली आहे.
जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे एक आठवडा रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर भात लागवड होते. आतापर्यंत ६० टक्क्यांहून अधिक भात लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नदी किनारी भागातील भात लावण्या पूर परिस्थितीमुळे थांबल्या होत्या. त्याही सुरू झाल्या आहेत. मागील आठवड्यातील शेवटच्या चार दिवसात सरींवर सरी पडत आहेत. त्याचा परिणाम पाणी नसलेल्या भागातील म्हणजेच कातळावरील किंवा डोंगराळ भागातील भात लावण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुका पर्जन्यमान
* मंडणगड १८३९
* दापोली १७१९
* खेड १४०३
* गुहागर १४२८
* चिपळूण १७०६
* संगमेश्वर १७९९
* रत्नागिरी १३१३
* लांजा २९८०
* राजापूर १७२८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.