तरुणांच्या रोजगारासाठी ७१ कंपन्या स्थापन होणार

जिल्हा परिषदेचा पुढाकार; बचत गटांना लाभ
तरुणांच्या रोजगारासाठी ७१ कंपन्या स्थापन होणार
EmploymentAgrowon

पुणे : जिल्ह्यातील तरुणाईला ग्रामीण भागातच रोजगार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत महिला शेतकरी आणि बचत गटांच्या माध्यमातून ७१ कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात रोजगार देणारा उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहेत.

‘‘कंपन्या स्थापन केल्यानंतर राज्य सरकार, जिल्हा परिषदेच्या वतीने निधी आणि विविध बँकांद्वारे सवलतीच्या व्याजदरातील कर्जरूपी भांडवल दिले जाईल. या कंपन्यांमधून निर्मित उत्पादनांना फायदेशीर बाजारपेठ मिळवून दिली जाईल. कच्च्या मालाच्या मूल्यवर्धनाद्वारे उत्पादन वाढविले जाईल. बचत गटांची उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यात येईल. बचत गटांकडून तयार वस्तुंची गुणवत्ता सुधारण्यास वाव असेल. अशी या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे असतील,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यात या पूर्वीपासून राबविण्यात येत असलेल्या एक गट, एक उत्पादनावर अधिक भर दिला जाईल. त्यामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळून बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागू शकेल. राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद उपक्रमांतर्गत ‘महाजीविका अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात आली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी २०२२-२३ हे वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे केले जाईल.

ग्रामीण भागातील गावागावांत रोजगार निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून ३९ कोटी रुपये निधी दिला आहे. या शिवाय, विविध बँकांद्वारे सवलतीच्या व्याजदराने २०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com