राज्यातील धरणांत ७५ टक्के पाणीसाठा

जोरदार पावसामुळे लहान व मध्यम स्वरूपामध्ये असलेली ऊर्ध्व पैनगंगा, गोसी खुर्द, निम्न वर्धा, हतनूर, खडकवासला, चासकमान, वीर, गुंजवणी, घोड अशी अनेक धरणे भरत आली आहेत.
Water Storage
Water StorageAgrowon

पुणे ः जुलैमध्ये झालेला दमदार पाऊस (Rainfall) आणि ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत (Water Level In Dam) वेगाने वाढ होत आहे. राज्यातील ३ हजार २६७ धरणांची उपयुक्त पाण्याची क्षमता सुमारे १४३९.६९ टीएमसी आहे. त्यापैकी धरणांमध्ये आतापर्यंत तब्बल १०७४.५२ टीएमसी म्हणजेच सरासरी ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) झाला आहे.

जोरदार पावसामुळे लहान व मध्यम स्वरूपामध्ये असलेली ऊर्ध्व पैनगंगा, गोसी खुर्द, निम्न वर्धा, हतनूर, खडकवासला, चासकमान, वीर, गुंजवणी, घोड अशी अनेक धरणे भरत आली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटण्यास मदत झाली आहे.

यंदा जून महिन्यात पावसाच्या दडीनंतर जुलै महिन्यात दमदार पाऊस कोसळला. राज्यात दोन्ही महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. एक जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात ६७७.५ मिलिमीटर म्हणजेच २७ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोकणात पावसाने सरासरी गाठली आहे. उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस पडला आहे. जून महिन्यात राज्यात सरासरी असलेल्या २०९.८ मिलिमीटरपैकी अवघा १४७.५ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला होता. यात मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तूट दिसून आल्याने पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्या नव्हत्या.

मात्र जुलै महिन्यात सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस अखेरच्या आठवड्यापर्यंत सातत्याने कोसळत राहिल्याचे दिसून आले. त्यातच २५ जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी ४ ऑगस्टपासून पुन्हा पावसाने बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोदावरी, बाघ, कन्हान, वैनगंगा, बावनथडी, वणा, मुठा, भीमा, कोयना, कृष्णा, पंचगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Water Storage
Cotton Rate : कापूस यंदाही भाव खाणार?

गेल्या वर्षी याच काळात धरणांत ५६ टक्के एवढा पाणी साठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कोकण विभागातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोकणातील १७६ धरणांत १०९.७५ टीएमसी म्हणजेच सरासरी ८८ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये भातसा, सूर्याधामनी, मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, मध्य वैतरणा, बारावे या धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक विभागातील ५७१ धरणांत १४४.८३ टीएमसी म्हणजेच ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये दारणा, गंगापूर, भंडारदरा, मुळा, गिरणा, हतनूर, वाघूर या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

Water Storage
Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

पुणे विभागातील ७२६ धरणांत ४२३.५ टीएमसी म्हणजेच ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या विभागातील धरणांत ७१ टक्के पाणीसाठा होता. यंदा चांगलीच वाढ झाली आहे. विभागातील कोयना, राधानगरी, दूधगंगा, उजनी, भाटघर, पवना, पानशेत, खडकवासला, घोड या धरणांतील पाण्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस असल्याने ९६४ धरणांत १७२ टीएमसी म्हणजेच ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागातून पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणांतील पाण्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

अमरावती विभागातील ४४६ धरणांत १११.९२ टीएमसी म्हणजेच ७७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणांत ५० टक्के पाणीसाठा होता. यंदा जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे ऊर्ध्व वर्धा, अरुणावती, इसापूर, बेंबळा, काटेपूर्णा, पेनटाकीळ, खडकपूर्णा या धरणांत चांगलाच पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील ३८४ धरणांत ११२.४१ टीएमसी म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये इरई, पंच तोडलाडोह, इटियाडोह, निम्नवर्धा या धरणांत चांगलाच पाणीसाठा झाला असून विसर्गात वेगाने वाढ होत आहे.

- शेती, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

- जुलैच्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ

- धरणांत एकूण १०७४ टीएमसी पाणीसाठा

- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

- लहान, मध्यम आकाराची अनेक धरणे भरली

- नाशिक विभागातील ५७१ धरणांत १४४.८३ टीएमसी म्हणजे ६८ टक्के पाणीसाठा

- पुणे विभागातील ७२६ धरणांत ४२३.५ टीएमसी म्हणजेच ७८ टक्के पाणीसाठा

- अमरावती विभागातील ४४६ धरणांत १११.९२ टीएमसी म्हणजेच ७७ टक्के पाणीसाठा

- मराठवाड्यात ९६४ धरणांत १७२ टीएमसी म्हणजेच ६६ टक्के पाणीसाठा

- नागपूर विभागातील ३८४ धरणांत ११२.४१ टीएमसी म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा

राज्यातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :

प्रकल्प ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के

मोठे प्रकल्प -- १४१ --- ८४६.४७ --- ८२

मध्यम प्रकल्प -- २५८ --- १२७.१८ -- ६६

लघू प्रकल्प --- २८६८ ---१००.८३ --- ४४

एकूण --- ३,२६७ ---१०७४.५२ --- ७५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com