Water Storage : चास कमान धरणात ८० टक्के साठा शिल्लक
चास, ता. खेड ः चास कमान धरणात (Chas Kaman Dam) ८०.८१ टक्के (७.०८ टीएमसी) पाणीसाठा (Water Stock) शिल्लक असून, मागील वर्षी २१ जानेवारी रोजी हाच पाणीसाठा ९५.७२ टक्के होता म्हणजेच चालू वर्षी तो तब्बल सोळा टक्के कमी आहे. धरणातून सद्यः स्थितीत कालव्याद्वारे ५५० क्युसेक वेगाने पहिले आवर्तन सुरू असल्याची माहिती चास-कमान पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) वतीने देण्यात आली आहे.
खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या या धरणात चालू वर्षी योग्य नियोजनामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ८०.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणातून सोडण्यात येत असलेले पहिले आवर्तन हे शेतकऱ्यांच्या मागणीवरून गुरुवारपासून (ता. २२ डिसेंबर) सुरू असून, शेतकऱ्यांची पाण्याची मागणी संपताच कालव्यातून सुरू असलेले आवर्तन बंद केले जाणार आहे.
चालू वर्षी योग्य नियोजन करून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याने धरणातून पहिले आवर्तन २२ डिसेंबर रोजी सोडण्यात आले होते, त्या वेळी धरणात ९४.४६ टक्के म्हणजेच ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सोडण्यात आलेले आवर्तन आजतागायत सुरू असून धरणात ८०.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
योग्य नियोजन व आवर्तनातील योग्यपणे पाण्याचे वितरण झाल्यास पाण्याचा अपव्यय न होता उन्हाळी हंगामासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचे आवर्तन शक्य होणार असल्याचे संकेत असल्याने उन्हाळी हंगामातील कमी कालावधीतील नगदी पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.