फरक, फंड थकविलेल्या कारखान्यांची तक्रार करणार

काही कारखान्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या (Provident Fund) रकमा थकविलेल्या आहेत. अशा कारखान्यांची साखर आयुक्तांकडे (Sugar Commissioner) रीतसर तक्रार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

सोमेश्वरनगर, जि. पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक कारखान्यांनी (Sugar Mills) त्रिपक्षीय समितीच्या बारा टक्के वेतनवाढीचा फरक दिलेला नाही. तर, काही कारखान्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या (Provident Fund) रकमा थकविलेल्या आहेत. अशा कारखान्यांची साखर आयुक्तांकडे (Sugar Commissioner) रीतसर तक्रार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

निंबूत (ता. बारामती) येथे राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाच्या जनरल कौन्सिलची वार्षिक सर्वसाधारण सभा कामगार नेते तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.२४) पार पडली. याप्रसंगी अविनाश आपटे, कार्याध्यक्ष राऊ पाटील, कार्याध्यक्ष शंकराव भोसले, सरचिटणीस प्रदीप बनगे, कोषाध्यक्ष युवराज रणवरे, उपाध्यक्ष नितीन बेनकर, अशोक बिराजदार, प्रदीप शिंदे, सयाजी कदम, राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, संजय पाटील, योगेश हंबीर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत साखर कामगारांच्या (Sugar Worker) प्रश्नांवर सविस्तर चर्चा कऱण्यात आली. आर्थिक व व्यवस्थापकीय प्रश्नांना एकमताने मंजुरी देण्यात आली. साखर कामगारांना १ एप्रिल २०१९ पासून बारा टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली. साधारणतः तीस महिन्यांचा फरक कारखान्यांकडे थकीत आहे. कारखाने अक्षम्य विलंब करत असल्याने साखर आयुक्तालयाकडे गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय झाला.

कामगार नेते बाळासाहेब काकडे यांनी प्रास्ताविक केले. कैलास जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले. तानाजी सोरटे, धनंजय खोमणे, संतोष भोसले, अजित शिंदे, विलास दानवले, हनुमंत भापकर, विशाल मगर यांनी संयोजन केले.

शरद पवारांच्या अभिनंदनाचा ठराव

साखर कारखानदारीदेखील अडचणीतून चाललेली आहे. अशात कोरोना संसर्गाने उद्योगात आर्थिक मंदी होती. त्यामुळे साखर कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. अशा प्रतिकूल स्थितीतही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकारामुळे कारखाने, सरकार आणि कामगार या सर्वांसाठी समन्यायी ठरेल असा तोडगा निघाला आणि बारा टक्के इतकी समाधानकारक वेतनवाढ मिळाली. यामुळे शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सभेत एकमताने घेण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com