शेतकऱ्याचा मुलगा झाला मंत्रालयात लिपिक

शेतकरी पीक चांगले येण्यासाठी राबराब राबतो. तितकेच कष्ट शिक्षणासाठीही घेतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध असले तरी ते भविष्याची वाटचाल दिशादर्शक करणारे असायला हवे.
Prashant Jadhav
Prashant JadhavAgrowon

मालेगाव, जि. नाशिक : शेतकरी पीक (Crop) चांगले येण्यासाठी राबराब राबतो. तितकेच कष्ट शिक्षणासाठीही घेतो. शिक्षण (Education) हे वाघिणीचे दूध असले तरी ते भविष्याची वाटचाल दिशादर्शक करणारे असायला हवे. अपयशाने खचून न जाता अभ्यासाला परिश्रमाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते हे नाळे (ता. मालेगाव) येथील प्रशांत जाधव याने दाखवून दिले. माळमाथ्यासारख्या अवर्षणप्रवण भागातील शेतकरी अरुण जाधव यांच्या मुलाने स्पर्धा परीक्षेला गवसणी घालत ‘लिपिक’ पदाने मंत्रालय गाठले.

Prashant Jadhav
Agriculture Irrigation : ‘शाश्वत कृषी सिंचन’मधून सोलापूरसाठी ६९० शेततळी

छोट्याशा जेमतेम पाचशे लोकवस्तीच्या खेड्यात जिल्हा परिषद शाळेत बालशिक्षण घेत माध्यमिक शिक्षण चिखलओहोळ येथे दोन अडीच किलोमीटर पायपीट करून मिळवले. सततच्या शेतीच्या कामात गुंतलेले कुटुंब, बापाचे जेमतेम शिक्षण अशा परिस्थितीत प्रशांतने बहिणीच्या गावी वरखेडे (धुळे) येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुन्हा पुढे काय, असे असताना आशेचा किरण म्हणजे धुळे येथे आत्याकडे राहून कला शाखेची पदवी घेत स्पर्धा परीक्षेचे ध्येय ठेवले.

मूळ नाळे येथील कोते या चार भावंडांच्या गोकुळात शैक्षणिक क्रांती त्यांच्या मुलांनी घडवली होती. स्पर्धा परीक्षेने कृषी विस्तार अधिकारी, दोन फौजदार, दोन शिक्षक असे वैभव मिळाले. ही आतेभावांची प्रेरणा पाठबळ देणारी ठरली अन् खडतर प्रवास सुकर झाला. पदवीच्या शिक्षणात उपजत गुणांना संधी मिळाल्यामुळे प्रशांत अनेक छोट्यामोठ्या पारितोषिकांचा मानकरी ठरला.

Prashant Jadhav
Modern Agriculture : व्यवस्थापनातील सुधारणांद्वारे शेतीत जपली गुणवत्ता

शिक्षण घेताना आपली नाळ शेतीमातीशी घट्ट ठेवून शेतीची कामे, वखरणी, नांगरणी रात्री-अपरात्री पिकाला पाणी देणे. मजूर मिळत नसल्याने कांदा लागवड, कपाशी वेचणी हे प्रशांतचे नित्याचेच काम होते. पदवीचे शिक्षण घेताना ‘कमवा व शिका’ हा प्लॅन बी यशस्वी करत डीटीपी डिझायनिंग, टायपिंग कोर्सेस केल्याने शिक्षणाला हातभार लावला.

२०१७ मध्ये पीएसआय व विक्रीकर निरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा दिली. अवघ्या सहा गुणांनी हुलकावणी दिली तरी अपयशाने न खचता जिद्दीने पीएसआय फिजिकलसाठी धावला. शारीरिक चाचणीत यशस्वी होत मुलाखतीत गुणवत्तेत आला. मात्र, निवड क्षणभंगुर ठरली. पुन्हा परीक्षा देत मंत्रालय लिपिक पदावर निवड झाली. अजूनही प्रयत्न सोडलेला नसून पीएसआय व्हायचे स्वप्न सत्यात साकारायचे असल्याचे प्रशांतने सांगितले. शब्दांच्या दुनियेत रमणारा हा नवकवी बापाचे दुःखही सहजपणे मांडतो. या वाटचालीत आत्या, आई, भाऊ, भावजय, बहीण-दाजी, आतेभाऊ यांचे पाठबळ, आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी प्रेरक ठरल्याचे तो सांगतो.

कुटुंबाला हातभार म्हणून मिळालेली संधी समाजाच्या सेवेसाठी सत्कारणी लावीन. ग्रामीण माणसांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.
प्रशांत जाधव, मंत्रालय लिपिक, मुंबई

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com