
औरंगाबाद ः राज्याच्या शेतीमध्ये काहीही नवे प्रयोग करायचे असले, तरी सर्वांत पहिले शोधावा लागतो तो नांगर. जमीन सपाटीकरण, फळबाग असो की अन्नधान्याची शेती (Agriculture) असो, नांगर (Plow) नेहमी महत्त्वाची भूमिका बजावतो.
‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाच्या (Agrowon Agricultural Exhibition) निमित्ताने सध्या देशी नांगरापासून ते विदेशी बनावटीच्या हायड्रोलिक नांगराची वाटचाल समजून घेण्याची संधी शेतकरी घेत आहेत.
राज्याच्या पारंपरिक शेतीला लाकडी नांगराने सुरुवात झाली होती. त्यानंतर बैलचलित साधा लोखंडी नांगर आला.
त्यात पुन्हा शंतनुराव किर्लोस्कर यांनी आधुनिक नांगराला गावागावांत पोहोचविले. मात्र आताचे युग ट्रॅक्टरचलित नांगराचे आहे. त्यातही आता हायड्रोलिक नांगराच्या युगाला सुरुवात झाल्याचे ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनातून दिसते.
जालन्याच्या बदनापूर भागात शेती करणारे तरुण शेतकरी सागर गिरी म्हणाले, की या प्रदर्शनात साधा नांगर, पलटी नांगर, टू बॉटम नांगर, थ्री बॉटम नांगर, हायड्रोलिक नांगर बघण्यास मिळतो. हायड्रोलिक नांगरामुळे शेती जलद, कमी खर्चात जास्त कामे करण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे.
हायड्रोलिक नांगर हेच आता भविष्यकालीन शेतीचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे ट्रॅक्टर कंपन्यांनी आता प्रत्येक ट्रॅक्टरला हायड्रोलिक व्हॉल्व्हची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.
डिझेल खर्चात २५ टक्के बचत होते. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून अनुदान दिले जात असल्यामुळे या नांगरांची संख्या वाढते आहे.
औरंगाबादमधील चिकलठाणा भागात शेती करणारे प्रकाश बकाल म्हणाले, की या प्रदर्शनात नांगरांची माहिती देणारे ४-५ स्टॉल्स आहेत.
त्यात साध्या नांगरांपासून ते हायड्रोलिक नांगरांपर्यंत चांगली माहिती मिळते. सामान्य शेतकऱ्याला नांगरांची वाटचाल समजावून सांगण्यास हे प्रदर्शन मदत करते आहे.
नागरांमध्ये बोरॉन स्टीलचा वापर
छोट्या ट्रॅक्टरला जोडले जाणारे नांगर ४० ते ४५ हजार रुपये खर्चाचे, तर मोठ्या ट्रॅक्टरला जोडले जाणारे नांगर ७० ते ८० हजार रुपये किमतीचे आहेत.
‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनात शेतकऱ्यांना थेट पावणेदोन लाख रुपये किमतीचे हायड्रोलिक नांगर बघण्यास मिळत आहेत. या नांगरांचे फाळ बोरोन स्टील श्रेणीतील आहेत.
दरम्यान, या स्टीलचा वापर खास रेल्वे रूळ बांधणीसाठी केला जातो. बोरोन स्टीलपासून बनवलेले नांगर वजनाने हलके, शक्तिशाली आहेत. त्यांना वाक येत नसून ते गंजतदेखील नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.