
अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर (Solapur News) : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यासह माढा, पंढरपूर, बार्शीच्या विविध भागांतून गेल्या तीन-चार वर्षांत सातत्याने ट्रॅक्टर चोरीचे प्रकार वाढले होते.
पण पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेरीस ट्रॅक्टर चोर पोलिसांच्या हाती लागले असून, शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले तेरा ट्रॅक्टर, नऊ ट्रेलरसह एक ब्लोअर असा एकूण १ कोटी १५ लाख १५ हजारांच्या मुद्देमालासह यातील तीन संशयितांना मोहोळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
पप्पू कुबेर ओव्हाळ, उत्कर्ष ऊर्फ सोन्या नागनाथ पवार, बंडू कुमार पवार (सर्व रा. खरसोळी, ता. पंढरपूर) अशी यातील संशयित आरोपीची नावे आहेत.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, माढा, पंढरपूर, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यांतून गेल्या तीन-चार वर्षांपासून ट्रॅक्टर चोरीच्या (Tractor Chor) तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
मात्र संशयितांचा शोध लागत नव्हता, ही टोळी फक्त ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी करत असल्याने सोलापूरमध्ये या चोरांची ट्रॅक्टरगँग अशी ओळख निर्माण झाली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांतही भीतीचे वातावरण पसरले होते. बघता-बघता ट्रॅक्टर लंपास करण्याची कला या टोळीत होती. त्यामुळे या ट्रॅक्टर टोळीने पोलिसांसमोर चांगलेच आव्हान निर्माण केले होते.
या वाढत्या तक्रारीमुळे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली आणि शेवटी ट्रॅक्टर चोरांपर्यंत हे पथक पोहोचले.
ट्रॅक्टर चोरीसाठी टोळीची अशीही शक्कल
यातील संशयित आरोपी ज्या ट्रॅक्टरची चोरी करायची आहे, त्याच्या चालकाबरोबर सलगी वाढवायचे. साखर कारखान्यासह शेतकऱ्यांच्या शेतात आणि परिसरात हेरगिरी करत, ट्रॅक्टरचालकाशी सलगी वाढवून त्याच्या दिवसभराच्या कामकाजाची बारीक-सारीक माहिती घेत, चालक ट्रॅक्टर सोडून किती वेळ जातोय, याचा अभ्यास करायचे.
त्यानंतर वेळ पाहून ट्रॅक्टर पळवला जायचा, त्यानंतर चोरून नेलेल्या ट्रॅक्टरच्या चेसीचा नंबर ग्राइंडरच्या साह्याने घासून टाकत होते आणि कागदपत्रे आणून देतो, असे सांगून विक्री करत होते. त्यामुळे ही टोळी काही पोलिसांच्या हाती लागत नव्हती.
शेतकऱ्यांकडून पोलिसांचा सन्मान
शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे घेऊन ट्रॅक्टर विकत घेतले आहेत. त्यांचे हप्तेही ते फेडत आहेत. पण अशातच ट्रॅक्टरची चोरी झाल्याने ते आर्थिकदृष्ट्या गोत्यात आले.
पण ट्रॅक्टर टोळी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, यातील शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केलेच, पण थेट मोहोळ पोलिस ठाणे गाठून आपला ट्रॅक्टर त्यात आहे का, यासाठी एकच गर्दी केली.
पण पोलिसांनी लवकरच ज्यांचे ट्रॅक्टर सापडले आहेत. त्यांच्याकडून ओळख पटवून घेऊन त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांचा सन्मान केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.