
अमरावती : मेळघाटात पावसाळ्यात अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना (Health System) अशा ठिकाणी पोहोचणे फार जिकिरीचे होते. पावसाळ्यातही दुर्गम गावात (Remote Village) पोहोचून उपचार करणे सोयीचे होण्यासाठी फॅब्रिकेटेड पुलांची (Fabricated Bridge) व सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणेची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शुक्रवारी (ता.२) आढावा बैठकीत दिले.
अचलपूर विश्रामगृह येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी या वेळी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, की मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यूचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येतील. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण संकल्पना राबविल्या जाणार. मृत्युदर शून्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाईल.
मेळघाटातील आरोग्य केंद्रातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ तसेच डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य केंद्रातील आवश्यक वैद्यकीय उपकरणे, सोयीसुविधा औषधींचासाठा, रुग्णवाहिका पूरक प्रमाणात ठेवण्यात येईल. कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचे स्थानिकरीत्या समिती स्थापन करून समुपदेशन करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की आरोग्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची नियमित उपस्थिती राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीपट सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. आरोग्यसेवा पुरवताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी या वेळी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.