Aarey Milk : आरे केंद्रचालक संकटात?

महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बृहन्मुंबई दूध योजनेची दुरवस्था झाली आहे. आरे दुधाचे उत्पादन आणि पुरवठा १२ नोव्हेंबरपासून पूर्णतः ठप्प झाला आहे.
Aarey Milk
Aarey MilkAgrowon

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बृहन्मुंबई दूध योजनेची (Milk Scheme) दुरवस्था झाली आहे. आरे दुधाचे उत्पादन (Milk Production) आणि पुरवठा १२ नोव्हेंबरपासून पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे आरेचे दूध केंद्र, महापालिका-शासकीय संस्था आणि रुग्णालयांना होणारा पुरवठा (Milk Supply) तर बंद झालाच आहे; परंतु दूध दरवाढीचे संकटही आहे. शासनाचा आरे प्रकल्पही बंद पाडण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबईतील आरे दूध केंद्रचालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Aarey Milk
Cooperative Milk Union : राजारामबापू दूध संघ संचालकपदी विनायक पाटील

मुंबईत आरेचे तीन युनिट होते. त्यातील कुर्ला येथील युनिट २०१६ मध्ये बंद झाले. वरळीतील युनिटला जुलै २०२२ मध्ये टाळे लागले. गोरेगाव येथील तिसरे युनिट सुरू असले, तरी त्यातून होणारा दूधपुरवठा १२ नोव्हेंबरपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शासनाकडून सध्या सुरू असलेले एकमेव युनिटही बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सध्या आरे दुग्धशाळेत २०० च्या आसपास कर्मचारी आहेत. त्यांच्यावर बेकारीची टांगती तलवार आहे. आरे दुग्धशाळेवर अवलंबून असणारी १८०० पेक्षा अधिक केंद्रे आहेत. त्या केंद्रांवर दूध येत नाहीच शिवाय दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठाही बंद आहे. त्यामुळे अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. पुढे ती कायमची बंद झाली तर शेकडो केंद्रचालकांवरही बेरोजगार होण्याची भीती आहे.

Aarey Milk
Jalgaon District Milk Producers Union : दूध संघाच्या कार्यकारी संचालका विरुद्ध पुन्हा तक्रार

आरे दुधाची किंमत प्रतिलिटर ४० रुपये आहे. समतुल्य घन-घटकाच्या इतर ब्रँडचे दूध ५० ते ५२ रुपये लिटर आहे. मुंबईकरांना प्रतिलिटर १० ते १२ रुपये जास्त देऊन दूध घ्यावे लागत आहे. अशा प्रकारे मुंबईकरांची लूट होत असल्याचे सांगितले जात आहे.

दुधाचे दर वाढण्याची चिंता

आरेला होणारा दूधपुरवठा कमी झाल्याने गेल्या महिन्यात रोजचा दुधाचा पुरवठा २५ हजार लिटरवरून १० हजार लिटरपर्यंत खाली आला होता. शाळा आणि सरकारी कार्यालयांतील दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मुंबईतील पदपथावर कुठेही मुबलक दूध उपलब्ध आहे. परंतु मुंबई दूध योजनेच्या स्वतःच्या तीन दुग्धशाळा उपलब्ध असूनही मुंबईतील १८०० दूध केंद्रांचे मोठे नेटवर्क सध्या कोलमडले आहे. त्यामुळे इतर दूध पुरवठादारांकडे खरेदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिटरमागे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दूध संकलन बंद असल्याने तात्पुरता दूधपुरवठा थांबला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यावर तोडगा निघेल. आरे युनिट बंद करण्याचा कोणताही विचार नाही.
श्रीकांत शिपूरकर, दुग्ध व्यवसाय आयुक्त
आरे दुग्धशाळा वाचवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री, सहकार मंत्री, सचिव आणि आयुक्तांशी चर्चा केली. मात्र त्यातून अजून तरी तोडगा निघालेला नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत.
राम कदम, समन्वयक, आरे बचाव संघर्ष समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com