
Satara News : येत्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) जिल्ह्यातील विविध पीक पद्धती पाहता आवश्यक रासायनिक खते व बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९७ हजार ३४८ हेक्टर असून त्याकरिता ४७ हजार ३३९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. तर, १ लाख ३६ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून जिल्ह्यासाठी १ लाख १५ हजार १०१ टन रासायनिक खत आणि ५४ हजार ७७० नॅनो युरिया बॉटलचे आवंटन खरीप हंगामासाठी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ४२ हजार ५२१ टन, डीएपी १२ हजार १३१ टन, एमओपी ६ हजार ७६१ टन, सुपर फॉस्फेट ११ हजार ९३९ टन तर इतर संयुक्त खते ३९ हजार १९ टन खतांचा समावेश आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात ६३ हजार ५६१ टन खत उपलब्ध आहे. यामध्ये मागील हंगामातील ५५ हजार ८६२ टन खत शिल्लक आहे. तर एक एप्रिल २०२३ पासून ७ हजार ६९९ टन खत पुरवठा करण्यात आलेला आहे.
उपलब्ध खतामध्ये युरिया १८ हजार ९४३ टन, डीएपी ९ हजार ११९ टन, एमओपी ८३४ टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ७९८ टन, इतर संयुक्त खते २४ हजार ८६७ टनाचा समावेश आहे. कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध खतांची माहिती पाहण्यासाठी कृषी विभागाने कृषिक ॲप च्या माध्यमातून सेवा उपलब्ध केलेली आहे.
हे कृषिक ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकरी बांधवांनी हे ॲप डाऊनलोड करून खत उपलब्धतेच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. माईनकर यांनी केले आहे.
रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच खतांच्या सुयोग्य समतोल वितरणासाठी जिल्ह्यात १२ भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. तसेच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.
कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते बियाणे व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले द्यावीत. तसेच शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा विषयी शंका असल्यास संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.