वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग

या रेल्वे प्रकल्पाकरिता जवळपास १ हजार १४५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले असून, अतिरिक्त अंदाजे तीनशे हेक्टर जमिनीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.
Vardha-Yavatmal-Nanded Rail
Vardha-Yavatmal-Nanded RailAgrowon

दिग्रस, जि. यवतमाळ : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला वेग आला आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्राथमिक स्वरूपाच्या कामात रस्ते, नकाशे व आखणीचे काम झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामे म्हणजे रेल्वे रुळाचे स्थान निश्‍चित झालेल्या ट्रॅकवर खोदकाम, मातीकाम, दबाई आदी कामांना वेग आला आहे. या रेल्वे प्रकल्पाकरिता जवळपास १ हजार १४५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले असून, अतिरिक्त अंदाजे तीनशे हेक्टर जमिनीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. तर पावसाळ्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील काम म्हणजे आवश्यक ठिकाणी नदी व नाल्यावरील रेल्वेपूल, गावे व शेतातील अंडरपास या कामांना सुरुवात होणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा रेल्वेप्रकल्प केंद्र सरकारने विशेष प्रकल्पात समाविष्ट केला असल्याने या प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भूप्रदेशाला जोडणाऱ्या या प्रकल्पाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होती.

या परिसरातून रेल्वे झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना अनेक व्यापारासोबतच कृषी उद्योग व्यापाराला सुद्धा चालना मिळेल. शिवाय नागपूर मुंबईकडे जाताना आणि दक्षिणेला जाताना अनेक शहराचे अंतर कमी होणार आहे. वर्धा-यवतमाळ -नांदेड या २८४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर सात भुयारी मार्ग असतील. या प्रकल्पावर अंदाजे आठशे कोटी रुपये खर्च अनुमानित होता. परंतु प्रकल्प पूर्ण होईल तोपर्यंत अंदाजे पाच हजार कोटी रुपये त्यावर खर्च होईल, असा अंदाज आहे.

या प्रकल्पाच्या वर्धा ते यवतमाळ पर्यंतच्या ७७ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाचे काम सेंट्रल रेल्वेकडून होणार आहे. तर यवतमाळ ते नांदेड पर्यंतच्या २०६ किलोमीटर अंतराचे काम रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अर्थात रेल विकास निगमच्या माध्यमाने केले जाणार आहे. या ट्रॅकवर एकूण चोवीस स्टेशन असतील.

दिग्रस तालुक्यामध्ये दोन स्टेशन असतील त्यापैकी हरसूल या ठिकाणी स्टेशन असेल तेथून पोहरा देवी स्टेशन अर्थात वाईगौळ येथे स्टेशन देण्यात आले आहे. नवरात्री आणि रामनवमीच्या प्रसंगी या स्टेशनला यात्रा स्पेशल स्टेशन म्हणून वापरले जाईल. तेथून दिग्रस येथील ईसापूर या ठिकाणी मुख्य स्टेशन असेल.

गावपातळीवरून पाठपुरावा

या प्रकल्पाची गरज पाहता परिसरातील ग्रामपातळीपासून मागणी केली जात होती. अनेक ठिकाणी विविध कृती समित्याही तयार होऊन त्यांनी आपापल्या परीने पाठपुरावा केला. दिग्रस येथील जागरण जनमंच या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पाठविले होते, त्याची विशेष दखल घेतल्या गेली आहे. यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gavali) यांच्यासह जिल्ह्यातील नेते व लोकप्रतिनिधींनीही या संदर्भामध्ये सतत पाठपुरावा केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com