
कऱ्हाड ः प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत (Safe Travel) प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने (ST Mahamandal) कंबर कसली आहे. रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक (Clean Bus Stand) आणि परिसर स्वच्छ, टापटीप असेल या बरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ व निर्जंतुक असतील, या त्रिसूत्रीचा वापर एसटी महामंडळाकडून प्रत्येक बसस्थानकावर करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही एसटी प्रशासनाने सुरू केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एसटीचे खाते आहे. त्यांच्या उपस्थितीत नुकतीच महामंडळाच्या ३०२ व्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वच्छतेचे आगार निहाय नियोजन करण्यात येत असून, जिथे महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी नाहीत तेथे स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार कंत्राटी स्वच्छता कर्मचारी नेमून स्वच्छता करून घेण्यात येणार आहे. गरज पडल्यास निविदा प्रक्रिया राबवून विभागीय स्तरावर स्वच्छता संस्था नेमण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहत.
ज्या आगारात स्वयंचलित बस धुलाई यंत्र नाहीत, तेथे नव्याने धुलाई यंत्र जोडण्यात यावे, बसेसच्या स्वच्छतेबाबत बसची अंतर्बाह्य सखोल स्वच्छता, बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणे, गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत, याची दक्षता घेणे, बसमधील आसने सुस्थितीत असतील याची खातरजमा करणे, फाटलेल्या सीट तातडीने दुरुस्ती करून, बसचा अंतर बाह्य रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घेणे या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
प्रवाशांमध्ये स्वच्छता
दूतामार्फत जनजागृती
स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यात स्वच्छता ठेवणे आणि स्वच्छता राखणे या दोन्ही कृतींचा योग्य मिलाफ असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्थानके आणि परिसर, एसटी बसेस स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची आहे. तसेच प्रवाशांमध्ये जनजागृती करणे, प्रवासी जनतेचे स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे व त्यांचा सकारात्मक सहभाग नोंदविण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून केला जाईल.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बस स्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची कार्यवाही राज्यातील सर्व बसस्थानकात केली जाणार आहे.
- अभिजित भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ, मुंबई
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.