
मालेगाव, जि. नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik DCC Bank) सक्तीच्या वसुली विरोधात सोमवारी (ता.१६) येथील पोलिस कवायत मैदानावर बिऱ्हाड मोर्चा (Birhad March) नेण्यात आला. (Raju Shetti News)
दरम्यान, शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर सरळ व्याजाने आठ टक्के व्याज आकारून एकरकमी तडजोड, सक्तीच्या वसुलीला स्थगिती तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेच्या नावे झाल्या आहेत, त्यांना स्थगिती देऊन एकरकमी तडजोडीत संधी देऊ, असे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले.
त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.
दरम्यान, सहकारमंत्र्यांनी लेखी आश्वासन न दिल्याने आंदोलनकर्त्यांमधील शेतकरी संघटनेचा एक गट आंदोलनावर ठाम आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे-पाटील व महिला आघाडीच्या सीमा नरोडे यांचे समर्थक आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत संघटनेचा निर्णय झालेला नव्हता. ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मात्र आंदोलनातून काढता पाय घेतला.
जिल्हा बँकेने बँकेवर दरोडा घालणाऱ्या धनदांडग्यांची कर्जवसुली करावी. शेतकऱ्यांची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, एकरकमी परतफेडीसाठी सवलत द्यावी. सहा ते आठ टक्के व्याजाने थकीत कर्ज भरुन घ्यावे. यासाठी स्वाभिमानीसह शेतकरी संघटनेतर्फे बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले.
दरम्यान सहकारमंत्री सावे यांनी मागण्या मान्य केल्या असून त्याचा पाठपुरावा आपण करू. आंदोलन मागे घ्यावे, असे आश्वासन भुसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या भूमिकेला शेतकरी संघटनेच्या एका गटाने विरोध दर्शविला.
‘ही लढाई आर-पारची असून लेखी आश्वासन हवे’, या भूमिकेवर ते ठाम होते. आंदोलनात शेट्टींसह, डहाळे, अर्जुन बोराडे, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, सीमा नरोडे, संदीप जगताप, खेमराज कोर, शेखर पगार, बिंदू शर्मा, वसंतराव कावळे, संतोष रहेरे, भोजराज चौधरी आदी सहभागी झाले होते.
बिऱ्हाड आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे लक्षात आल्यानंतर चक्रे फिरायला सुरुवात झाली. जिल्हा बँकेवर दरोडा घालणारे नामानिराळे आहेत.
धनदांडग्यांना विनंती व शेतकऱ्यांवर कारवाई हे खपवून घेणार नाही. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर १६ फेब्रुवारीला ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या दारात सर्व शेतकरी धडकतील.
- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.