
Tehsildar Protest छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार (Tehsildar Association) राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे (Protest For Grade Pay) ४ हजार ८०० रुपये करावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) सामुदायिक रजा टाकून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामुळे तहसील कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला.
विभागीय आयुक्तालयापुढे सकाळी ११ पासून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. या वेळी ग्रेड पे देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी संघटनेचे विभागीय संघटक विजय चव्हाण म्हणाले,
‘‘महसूल विभागातील नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग दोनचे नाही. ग्रेड पे वाढवावे, यासाठी १९९८ पासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु याबाबत शासनाने कोणताही विचार केला नाही.
ग्रेड पे ४ हजार ८०० रुपये मंजूर करावा, यासाठी यापूर्वी बेमुदत संप केला होता. तत्कालीन महसूलमंत्री, अप्पर मुख्य सचिव यांच्यासह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यांची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.
तसेच के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करण्यासंदर्भात संघटनेमार्फत सादरीकरण करण्यात आले. परंतु विचार झाला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात एकदिवसीय रजा घेऊन विभागीय हे आंदोलन करण्यात आले.
...अन्यथा ३ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत कामबंद
दरम्यान, यानंतरही मागण्यांचा विचार न झाल्यास ३ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत कामबंद पुकारण्यात येणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी एक दिवसाची रजा घेतल्याने कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. शासकीय कामकाजाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे सोमवारी आंदोलन असल्याने अनेक जण कार्यालयात येऊन काम न होताच परत गेले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.