
Pune News : भीमाशंकर अभयारण्यालगत असलेल्या आदिवासी भागातील अतिदुर्गम आहुपे खोऱ्यात गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गव्यांनी भात शेतीसह (Paddy Farming) नव्याने प्रयोग करत असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे नुकसान (Strawberry Crop Damage) होत आहे. याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे.
गव्यांपासून झालेल्या नुकसानीचा आजपर्यंत पंचनामाही केला नाही. या नुकसानीची भरपाई न मिळाल्यास घोडेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडने दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की सामाजिक संस्थांच्या आणि उद्योगांच्या माध्यमातून या वर्षी राजपूर, सावरली, पाटण, डोण इत्यादी भागांत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी ही गव्यांनी पूर्णपणे खाऊन टाकली आहे. मात्र अजूनपर्यंत कोणीही वनविभागाचे अधिकारी तिकडे फिरकलेले नाहीत. परिणामी, या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनविभागाने जर या गव्यांचा त्वरित बंदोबस्त केला नाहीतर घोडेगाव येथील कार्यालयावर बिरसा ब्रिगेड व तिरपाड ग्रामपंचायतीच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची माहिती मातृशक्तीचे प्रमुख उमा मते यांनी दिली.
या वेळी बिरसा ब्रिगेडने वनपरीक्षेत्र अधिकारी घोडेगाव येथील महेश गारगोटे यांना निवेदन दिले आहे. या वेळी ताराबाई डामसे, मंगल कवठे, कविता डगळे, अरुणा खमसे इत्यादी महिला उपस्थित होत्या.
भीमाशंकर अभारण्यालगत अंदाजे ५ ते ६ गवे आदिवासी गावात आले आहेत. त्यांना नैसर्गिक अधिवासात परत पाठविण्यासाठी ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ढोल वाजवणे किंवा इतर आवाज करून त्यांना पुन्हा भीमाशंकर अभयारण्यात सोडण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. तसेच शेतीपिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी वनखाते बांधील आहे.
- महेश गारगोटे वनपरीक्षेत्र अधिकारी घोडेगाव
गवा आणि वाघ आदिवासी भागात सोडून, येथून आदिवासींना उठवून लावायचा छुपा अजेंडा वनविभागाच्या वतीने राबवत असल्याचे चित्र दिसत आहे. वनविभागाला या प्राण्याचा बंदोबस्त करणे शक्य होत नसेल, तर शासनाने आम्हा आदिवासींना तसे सांगावे त्यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू. कारण आदिवासी अजूनही तिरकामठा चालवायचा विसरला नाही.
- प्रवीण पारधी, पुणे जिल्हा अध्यक्ष बिरसा ब्रिगेड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.