
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक ः शेतीतील सद्यःस्थितीतील प्रश्न नेमके काय? त्यावर चिंतन करून उपाययोजना देण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी त्या मानसिकतेने काम केले पाहिजे. केंद्रीय कृषी संशोधन संस्थांच्या (Central Agricultural Research Institutes) शास्त्रज्ञांनी आता बाहेर पडण्याची गरज असून शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप असे शेतीचे आदर्श कामकाज अभ्यासले पाहिजे, अशा शब्दात केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा (Manoj Ahuja ) यांनी कानपिचक्या दिल्या.
श्री. आहुजा यांनी हे मंगळवारी (ता. २७) नाशिक दौऱ्यावर होते. सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला भेट दिल्यानंतर शेतकरी, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप सुरू केलेले उद्योजक व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय कृषी सचिव (अतिरिक्त) अभिलाष लिखी,फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार हे त्यांच्यासोबत दौऱ्यावर होते.
या वेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, पुष्प विज्ञान महसंचानलालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, कांदा व लसूण महासंचलनालयाचे डॉ. विजय महाजन,राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. सुजय साहा, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे संचालक डॉ. पी. के. गुप्ता, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आहुजा म्हणाले, शेतकऱ्यांनी संशोधन संस्थेत येऊन कृषी तंत्रज्ञान, कामे बघावी असे पूर्वी घडत होते, हा जमाना आता गेला. मात्र आता असे राहिलेले नाही. आता देशातील कृषी संशोधन संस्थांनी बाहेर पडून शेतीविषयक आदर्श कामे अभ्यासावी. नावीन्यपूर्ण कामे पाहून त्यातील भविष्य, शक्यता पडताळून मोठा आधार होऊ शकतो. सह्याद्री सारख्या शेती उत्पादक कंपनीने स्टार्टअपलाला सोबत घेऊन काही अडचणी सोडून त्यावर यश मिळवले आहे.
कृषी संबंधित स्टार्टअपमधून चांगल्या संकल्पना पुढे येत आहेत. हेच शेतीचे भविष्य आहे. त्यामुळे समस्यांवर मात करून कशा पद्धतीने प्रगती साधली जात आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी यंत्रणा तयार करून सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. काही स्टार्टअपला सोबत घेऊन निधी देण्याची तरतूद करण्यात येईल. त्यांच्यासोबत प्रायोगिक तत्त्वावर कामकाज करण्याचे धोरण आखण्यात येत आहे.
ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहे त्यांना संधी देऊन त्यांच्या उपयुक्ततेचा विस्तार केल्यास मोठा हातभार लागणार आहे. त्याबाबत वैधता व प्रमाणिकरण पूर्ण होईल त्यांनतर प्रायोगिक चाचण्या झाल्यानंतर व्यावसायिक पातळीवर त्याचा वापर करता येणे सोपे होईल. शेती कामकाजात पारदर्शकता, निर्यात प्रक्रियेत कामकाज करताना उत्कृष्ट शेती व्यवस्थापन या सर्व बाबी व्यापक पातळीवर नेण्याचा मानस व्यक्त केला.
शेतीत काहीही अशक्य नाही,
शक्य करण्यासाठी प्रयत्न व्हावेत
शेतकरी संघटित होऊन आपल्या प्रश्नांवर काम करून मूल्यसाखळ्या निर्माण करत आहेत. ‘सह्याद्री फार्म’ त्यातीलच एक उदाहरण आहे. सरकारच्या संशोधन केंद्रांमध्ये अनेक नामवंत शास्त्रज्ञ आहेत, ज्यांचे कृषी विकासात योगदान आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यावर उपाययोजना केल्यास पंतप्रधानांनी घोषणा केल्याप्रमाणे दुप्पट उत्पन्न होण्यास हातभार लागेल. शेतीत काहीही अशक्य नाही, शक्य करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आहुजा यांनी यावेळी नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.