
Agriculture Innovation : ‘‘शेतीक्षेत्रात ड्रोनचा (Agriculture Drone) मोठ्या प्रमाणात वापर वाढविण्यासाठी सरकारने स्वतंत्र योजना आणली आहे. त्यासाठी निधीही दिला आहे. येत्या काळात कृषी विभागामार्फत पायलट स्वरूपात प्रशिक्षण (Drone Training Program) देण्यात येईल. त्यामध्ये कृषी पदवीधरांना मोठी संधी आहे. पदवीधरांना पहिले प्राधान्य दिले जाईल,’’ असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
पुणे कृषी महाविद्यालयात विद्यापीठ महसुली उत्पन्नातून व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विविध नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत बेकरी उत्पादन, मत्स्य प्रात्यक्षिक, सभागृह, कर्मचारी निवास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
त्याचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते झाले. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, एजाज सय्यद आदी उपस्थित होते.
सत्तार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी सन्मान निधीत वाढ करणे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणणे, पीक विम्यामध्ये बदल करणे असे काही बदल केले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विद्यापीठाची साथ मिळत आहे. नवनवीन संशोधन करण्यासाठी विद्यापीठे पुढाकार घेत आहेत. विद्यापीठे हे फक्त पैसे कमविण्यासाठी नाही, तर ते सेवा देण्यासाठी आहेत.’’
‘‘कृषी महाविद्यालयात बांधलेल्या १ हजार क्षमतेच्या सभागृहासाठी १० कोटींची मान्यता देण्यात आली आहे. ६ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. उर्वरित ४ कोटींचा निधी दिला जाईल.
कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी केंद्रे आहेत. सध्या रासायनिक पद्धतीने धान्य पिकवण्याकडे कल वाढत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची कृषी विद्यापीठांची जबाबदारी आहे,’’ असेही सत्तार म्हणाले.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. बेकरीच्या उत्पादनांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात बेकरी व्यवसायातही प्रचंड वाव आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.