
मुरूड ः लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अंबोली धरणाच्या (Amboli Dam) उजवा व डावा तीर कालव्याचे (Canal) काम सात वर्षांपासून रखडले आहे. मुरूडमध्ये सात-आठ किमीच्या परिसरात अन्य कोणतेही मोठे जलस्त्रोत नसल्याने शेतीला पुरेसा पाणीपुरवठा (Agriculture Irrigation) होत नाही. धरणात पाणी असले तरी कालव्यांअभावी दुबार पिके घेता येत नाही.
तालुक्यात अत्यल्प भूधारकांची संख्या जास्त आहे. प्रत्येकालाच विहीर खोदणे शक्य होत नाही. म्हणून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
दोन्ही तीर कालव्याचे रखडलेले काम पूर्ण झाल्यास ६०० हेक्टरहून अधिक जमीन दुबार पिकती होऊन फळ लागवड, भाजीपाला व दुग्ध व्यवसाय करणे शक्य होईल.
अंबोली उजवा तीर कालव्याची लांबी ७.१० किमी तर डाव्या तीर कालव्याची लांबी २.६४ किमी इतकी असून आतापर्यंत दोन्ही तीर कालव्यांचे काम एक किमीपेक्षा पुढे न सरकल्याने धरण क्षेत्रातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अंबोली धरणाचे काम २००९ मध्ये सुरू झाले. धरणामुळे मुरूडसह सुमारे १२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून पर्यटनस्थळ असल्याने तरलत्या लोकसंख्येसाठीही धरण उपकारक ठरले आहे.
धरणासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शीघ्रे, नवीवाडी येथील ग्रामस्थांची जवळपास १७ एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. सरकारदरबारी तालुक्यातील ३,२०० हेक्टर क्षेत्रात भात शेतीची नोंद आहे, मात्र उधाणाचा फटका तसेच बांधबंदिस्ती नसल्यामुळे तसेच कांदळवन वगळता, प्रत्यक्षात भात क्षेत्र २,९०० हेक्टर इतकेच आहे
जिल्ह्यात अल्प भूधारकांची संख्या जास्त आहे. शेतकऱ्यांना संकरित बियाणे व खतांचा पुरवठा सवलतीच्या दरात दिल्यास लागवडीखालील क्षेत्र वाढेल. पाणी पुरवठ्याचे नियोजन झाल्यास रब्बी हंगामात वाल, चवळी, हरभरा, मूग आदी कडधान्याचे उत्पादन क्षेत्र वाढेल. शेततळे, जोड पिके घेतल्यास शेती फायदेशीर ठरू शकेल.
- मनीषा भुजबळ, कृषी अधिकारी, मुरूड
बंदिस्त नलिका वितरणप्रणाली या नवीन जल धोरणामुळे अंबोली कालव्याला २०२२ मध्ये १० कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. कालव्याचा सुधारित आराखड्याचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे पाठवला आहे. अंदाज पत्रकास मंजुरी मिळाल्यावर उर्वरित कामांची निविदा काढून कालव्याचे काम सुरू होईल.
- एस. डी जाधव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.