
औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) (एमआयडीसी)मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क (Agriculture Industrial Park) आणि उर्वरित क्षेत्रावर सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
सिल्लोड येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला. एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात सिल्लोडचे आमदार तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.
उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, की सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरू करायची आहे. या प्रस्तावित एमआयडीसीच्या निम्म्या क्षेत्रात कृषी औद्योगिक पार्क (ॲग्रो इंडस्ट्री पार्क) उभारल्यास कृषी अन्न प्रकिया उद्योगांना चालना मिळेल.
तसेच उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी वापरल्यास औद्योगिक समतोल राखता येईल. असेही ते म्हणाले. तत्पूर्वी सिल्लोड येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यात रोजगारासाठी उद्योग उभारणे आणि त्यांना चालना देण्याची गरज आहे. सिल्लोड परिसर हा डोंगरी भाग असून रस्ते, मुबलक पाणी अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योजक आणि इतर कंपन्यांना उद्योग उभारण्याबाबत आवाहन करणार, असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी या वेळी सांगितले.
या बैठकीला एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (दूरदृश्यप्रणालीद्वारे), उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगांवकर, अवर सचिव किरण जाधव, औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.