कृषिमंत्री दादा भुसे रिचेबल; अॅग्रोवनशी साधला संवाद
Dada BhuseAgrowon

कृषिमंत्री दादा भुसे रिचेबल; अॅग्रोवनशी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार

``आपण नॉट रिचेबल असल्याची बातमी खोटी आहे. आपण शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असून दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे,`` असे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी अॅग्रोवनला सांगितले. शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून ते गुजरातमधील सुरत येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासमेवत शिवसेनेचे चार मंत्री आणि ११ ते १३ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांच्या सोबत असलेल्या चार मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांचे नावही घेतले जात होते. यासंदर्भात अॅग्रोवनने थेट दादा भुसे यांच्याशीच दुरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपण नॉट रिचेबल असल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले.

``आपला संपर्क झालाय नाा. मी तुमच्याशी फोनवर बोलतोय. त्यामुळे मी नॉट रिचेबल असल्याचा प्रश्नच नाही,`` असे भुसे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि कृषिमंत्री दादा भुसे असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी दिल्या. दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. शिंदे यांच्या कथित बंडात भुसेही सामील झाल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली. भुसे यांनी खुलासा केल्यामुळे या चर्चेवर तुर्तास पडदा पडला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात अचानक उद्भवलेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक दुपारी वर्षा बंगल्यावर बोलावली आहे. आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत, असे भुसे यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितले.

राज्यात खरीप हंगामाची धामधुम सुरू असताना कृषिमंत्री नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चेमुळे एकच खळबळ उडाली होती. मॉन्सूनने राज्याचा बहुतांश भाग व्यापला असला तरी अजून पावसाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसेच कृषी विभागाने बियाणे आणि खतांच्या नियोजनाचे काम युध्दपातळीवर करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजून खरीप हंगामातील पिकविमा योजनेच्या निविदांचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे पिकविमाि योजनेची अंमलबजावणी कशी होणार, याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे. राज्यात बीड मॉडेल लागू करण्यास परवानगी देण्याचा विषय केंद्र सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहे. त्यामुळे जुनीच योजना यंदा राबवली जाणार, अशी चर्चा सुरू आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वेळ असताना दादा भुसे राजकीय बंडात सामील झाल्याने नेमके काय परिणाम होणार, यावर चर्चा रंगली होती. परंतु भुसे यांनी आपण मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुपारच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला. तसेच पिकविम्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com