Agriculture Officer : कृषी अधिकाऱ्याचे शेतकऱ्यांकडून स्वागत
गडचिरोली : उपविभागीय कृषी अधिकारीपदी (Agriculture Officer ) असताना जिल्ह्यात शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविणाऱ्या व सध्या आयुक्तालयात कृषी उपसंचालक पदावर असणाऱ्या प्रीती हिरळकर यांचे गडचिरोली जिल्हा दौऱ्याप्रसंगी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश होता.
हिरळकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत नंदनवन शेती संकल्पना राबविली. या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे यंदा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्र वाढणार आहे. हिरळकर यांच्या पुढाकाराने ५१ एकर शेती क्षेत्राला सामुहिक कुंपण करण्यात आले. त्यावर अवघा पाच लाख रुपयांचा खर्च झाला.
शेतकऱ्यांमध्ये पाणी बचतीचे गुण रुजावे, याकरिता योजनेतून तुषार संच देण्यात आले. सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत चिकट सापळे, दशपर्णी अर्क व इतर निविष्ठा घरच्या घरी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यासोबतच अनेक योजनांमधून शेतकऱ्यांनी शेतमाल साठविण्यासाठी शेड बांधकाम, गोदाम उभारणी असे उपक्रमही राबविले.
हिरळकर गडचिरोली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विस्तारी परचाके, नांतू बनिक, मारुती पल्लो, साईनाथ उरते, अंबादास आत्राम, दौलत परचाके, आशा रामटेके, वनिता परचाके, फुलमाला मुजुमदार, रीना सरकार, पूजा परचाके, शंभू गौरी आदिवासी महिला शेतकरी गट, वसुंधरा महिला गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.