
Agriculture Produce Market Committee पुणे ः बाजार समित्या (APMC) या शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या असल्या पाहिजेत यासाठी पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे, त्यांनी ती इमाने इतबारे पार पाडली पाहिजे.
मागच्या संचालक मंडळातील काही संचालक पेट्रोलपंपाच्या कॅशमध्ये हात घालून तसेच बाहेर निघायचे. तर वजनकाट्यातील काटछाट, गळती, आदी खूप बाबी आहेत. हे सगळे आपल्या डोक्याच्या बाहेरचे आहे. त्यामुळे माझ्या डोक्याचा केस ना केस गेला.
एवढे घनदाट केस होते पार वाट लावली माझी, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मेळाव्यात माजी संचालक मंडळातील गैरकारभाराचे वाभाडे काढले.
पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते.
यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगबंर दुर्गाडे, माजी संचालक सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, माणिकराव गोते, कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, माजी संचालक गणेश घुले, विलास भुजबळ, शिवाजी सूर्यवंशी, अडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर यांच्यासह बाजार समितीचे घटक उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे (हवेली) बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ विविध कारणांनी बरखास्त झाले. त्यांच्या चौकशा सुरू असून त्याचा निकाल लागेल तो लागेल.
पण आपलेच पदाधिकारी परस्पर निर्णय घेऊन टाकतात. आपल्यावर टाकलेली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडायची असते. तिथे पैसे कमवायला जायचे नसते.
काहीजण केवळ पत्रिकेवर संचालक नाव लागावे म्हणून संचालक मंडळात जातात. बाजार समितीचे संचालक व्हायचे असेल तर वेळ देता आला पाहिजे. बाजार समितीमध्ये वजनकाट्यातील काटछाट, गळती, आदी खूप बाबी आहेत.
शेतकरी वर्गात आर्थिक सुबत्ता यावी. शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापारी यांच्यात समन्वय साधून त्यांच्या अडचणी सोडविल्या गेल्या पाहिजेत. पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला, तर समाजासाठी बाजार समिती अथवा संबंधित संस्थेच्या माध्यमातून खूप काही चांगले करता येते.’’
जुन्या संचालकांवर टांगती तलवार
आपल्याच काही चुकांमुळे गेली १९ वर्षे हवेली बाजार समितीची निवडणूक झाली नाही. त्यामुळे आपला कार्यकर्ता वंचित राहिला. आता आगामी निवडणुकीसाठी जागा कमी आणि इच्छुक जास्त आहेत.
त्यामुळे जुन्या लोकांनी फार काही अपेक्षा धरू नयेत. तसेच पक्ष पुरस्कृत पॅनेल करण्याबाबतचा अंतिम निर्णय मतदारांचा कल पाहून अधिवेशनानंतर घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.