
जळगाव ः खानदेशातील ताकदवान नेते सुरेश जैन (Suresh Jain) यांना न्यायालयाने नियमीत जामीन दिला आहे. त्यांच्या समर्थकांत आनंद आहे. पण त्यांनी अद्याप आपण ठाकरे की शिंदे गटात (Eknath Shinde Camp) आहोत, हे स्पष्ट केलेले नाही. पण जैन पुढे जळगावच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता कमी असून, ते मार्गदर्शक म्हणून काम करतील, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
जैन हे ठाकरे गटाचे असल्याची दावेदारी सुरू आहे. जळगावात मोठा जल्लोष ठाकरे गटातील नेत्यांनी केला. पण जैन यांनी आपण ठाकरेंसोबत आहोत, असे अद्याप स्पष्ट केलेले नाही. यामुळे जैन पुढे कोणती राजकीय भूमिका घेतील, हादेखील मुद्दा आहे. जैन हे आता सुमारे ८० वर्षांचे आहे. वैद्यकीय व इतर कारणांनी ते राजकारणात पूर्वीसारखे सक्रिय होतील, याचीही शक्यता फारशी नाही. पण ते पुढे मार्गदर्शकाची भूमिका निश्चित निभावतील, असे जाणकारांचे मत आहे.
जैन हे १९८० मध्ये राजकारणात आले. सुरुवातीला सात वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनानंतर शिवसेनेत आले. शिवसेनेत वैचारिक मतभेद झाले व पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. कॅबिनेट मंत्री असताना अण्णा हजारे यांनी जैनांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि जैन यांनी राजीनामा देवून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. पुढे घरकूल गैरव्यवहारासंबंधी त्यांना अटक झाली.
कारागृहात जावे लागले. २०१४ मध्ये कारागृहातून शिवसेनेतर्फे ते जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. पण त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. सलग नऊ वेळेस जैन विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. ३० वर्षे जैन गटाची जळगाव पालिकेत सत्ता होती. ही सत्ताही भाजपने हिसकावून घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते व तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय वैर होते. जैनांना आपल्याच पाठपुराव्याने कारागृहाची हवा खावी लागली, असे खडसे आपल्या राजकीय भाषणांत जाहीरपणे सांगायचे. ठाकरे गटात सक्रिय झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील इतर नेते व खडसेंशी जुळवून घ्यावे लागेल. पण जैन हे तडजोडीपासून नेहमी दूर राहीले. दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याशी जैन यांचे चांगले ट्युनिंग आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.