
नाशिक : लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) नवीन कांदा बाजार (Onion Market) आवारावर येणारे शेतकरी अनेक सोयी व सुविधांपासून वंचित असल्याबाबत काही समाज कंटकांमार्फत समाज माध्यमांवर बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत. या बातम्या केवळ राजकीय द्वेषापोटी प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
काही समाजकंटक बाजार समितीची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी रात्री-अपरात्री बाजार समितीच्या आवारात प्रवेश करून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरतात. तसेच शेतीमाल विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा जमाव गोळा करून बाजार समितीतील सोयी व सुविधांबाबत त्यांना चिथावणी देतात. बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, मंत्री यांना अवेळी दूरध्वनी करून समितीच्या कामकाजाबाबत गैरसमज पसरविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी मुक्कामी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयी व सुविधांसाठी संपूर्ण बाजार आवारात पुरेशी प्रकाश व्यवस्था सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र त्याठिकाणी हायमास्ट दिवे व भूमिगत विद्युतीकरण केलेले असल्याने काही भागांतील दिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी केबलमधील दोष सापडत नसल्याने त्या भागातील दिवे बंद होते. तसेच तेथील स्वच्छतागृह, उपहारगृह व शेतकरी निवासची व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यासाठी समितीचे प्रशासन कार्यवाही करीत होते; मात्र सुरू असलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी काही जणांकडून आवारातील ज्या भागात काम झालेले नाही, अशा सुविधांचे फोटो व चित्रीकरण काढून समाज माध्यमांवर आवारातील सोयी व सुविधांबाबत गैरसमज पसरवित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे वाभाडे काढणाऱ्यांना वेळीच समज देण्याची वेळ
बाजार समितीच्या कामकाजाबाबत अथवा सोयी सुविधांबाबत समितीचे पदाधिकारी अथवा प्रशासनाकडे विधायक सूचना मांडल्यास त्याचा विचार करून अंमलबजावणी करण्यात येते; मात्र गावचे वैभव असलेल्या संस्थेचे वाभाडे काढणाऱ्यांना गावकऱ्यांनी वेळीच समज देण्याची वेळ आली असल्याचे जगताप यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.