
अमरावती : येथील नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमध्ये पीएम मित्रा योजनेअंतर्गत (PM Mitra Scheme) प्रस्तावित टेक्स्टाइल पार्क (Textile Park) औरंगाबाद येथे पळविण्यात येत आहे. हा पार्क औरंगाबाद येथे नेण्यासाठी शिंदे -फडणवीस (Shinde Fadanvis) सरकारने कारस्थान रचल्याचा आरोप माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केला.
डॉ. सुनील देशमुख यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गतवर्षीच्या अर्थसंकल्पात देशात पीएम मित्रा योजनेअंतर्गत फाइव्ह एफ या तत्त्वावर देशांत सात ठिकाणी टेक्स्टाइल पार्क देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. याकरिता ४४४५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. अमरावती येथील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये मेगा टेक्स्टाइल पार्कसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याने महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातून अमरावती जिल्ह्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
१५ मार्च २०२२ ही त्यासाठी अंतिम मुदत होती. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री दर्शना जरदोश यांनी २३ मार्च २०२२ ला देशातील १३ राज्यातून १७ प्रस्ताव आल्याची माहिती जाहीर केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून अमरावतीचा प्रस्ताव होता हे स्पष्ट होते. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय अर्थमंत्री व वस्त्रोद्योगमंत्री यांची भेट घेऊन हा टेक्स्टाइल पार्क अमरावती ऐवजी औरंगाबाद येथील ऑरीक सिटीमध्ये उभारण्याचा आग्रह धरला. त्यामुळे अमरावतीचा प्रकल्प बारगळल्या जाणार असल्याचा आरोप डॉ. सुनील देशमुख यांनी केला.
नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमध्ये एक हजार हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झालेले असताना, अनुशेषग्रस्त जिल्हा व सर्वांत मोठा कापूस उत्पादक जिल्हा असताना अमरावतीच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याचे व नव्या सरकारच्या षंडयंत्रचा हा भाग असल्याचे ते म्हणाले. विभागीय मुख्यालयाच्या अमरावती जिल्ह्याचा वाटा पळविण्याचा शिंदे -फडणवीस सरकारचा हा प्रयत्न सर्व तरुणांनी व शेतकऱ्यांनी हाणून पाडावा,असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या वेळी प्रदेश प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, किशोर बोरकर व भय्या पवार उपस्थित होते.
दोन्ही खासदारांनी पुढाकार घ्यावा
जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे केंद्र सरकारमध्ये वरिष्ठांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आपले हे संबंध वापरून हा प्रकल्प पळविण्याचे षड्यंत्र हाणून पाडावे, असे आव्हानही त्यांनी केले. हा प्रकल्प पळविल्या जात असताना हनुमान चालिसा वाचणारे लोकप्रतिनिधी त्यांच्या वरिष्ठांना हा प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवतील का, असा प्रश्नही डॉ. देशमुख यांनी केला.
बीडीएलही हैदराबादला
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी उद्घाटन केलेला भारत डायनामिक्स हा क्षेपणास्त्र निर्मिती करणारा प्रकल्प हैदराबाद येथे स्थानांतरित करण्यात आल्याची माहिती असल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी या वेळी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.