'अमूल' आता सेंद्रीय उत्पादने विकणार

अमूलतर्फे देशात पाच ठिकाणी सेंद्रिय उत्पादनांच्या चाचणीची सुविधा असलेल्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. चाचणीचा खर्च कमी करण्यासाठी या प्रयोगशाळांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
Organic Products
Organic ProductsAgrowon

दुग्धोत्पादनात अग्रेसर 'अमूल' हा ब्रँड प्रस्थापित करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलचे सेंद्रिय गव्हाचे पीठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.

अमूलने (GCMMF) शनिवारी (तारीख २८ मे) आपले पहिले सेंद्रिय उत्पादन सेंद्रिय गव्हाचे पीठ बाजारात दाखल केले असल्याची घोषणा केली आहे. सेंद्रिय गव्हाखेरीज मूग डाळ,चना डाळ, बासमती तांदूळ इत्यादी सर्व प्रकारची सेंद्रिय उत्पादने बाजारात विक्रीसाठी दाखल होणार असल्याचेही अमूलतर्फे सांगण्यात आले आहे.

अमूल' हा दुग्ध उत्पादनातील ब्रँड विकसित करणाऱ्या आणि देशभरात लोकप्रिय करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी पुढाकार घ्यावा, असा आग्रह केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी फेडरेशनकडे धरला होता.अमूलने केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्र्यांचा सल्ला मनावर घेत २८ मे रोजी सेंद्रिय गव्हाचे पीठ विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी दाखल केले.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमूलच्या गांधीनगर येथील प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी अमित शहा यांनी सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या विपणनाची गरज व्यक्त केली होती. त्यासाठी अमूल फेडरेशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. अमूलने सेंद्रिय उत्पादनांच्या चाचण्या, वितरण आणि विपनणासाठी पायाभूत यंत्रणा उभारावी, अमूल हे काम नक्कीच उत्तमपणे करू शकेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला होता.

सध्या सेंद्रिय उत्पादकांसमोर आपल्या मालाच्या गुणवत्तेबाबतच्या चाचण्या कुठे करायच्या ? हा प्रश्न आहे. कारण ही प्रक्रिया खर्चिक आहे. त्यामुळे फेडरेशतर्फे देशात पाच ठिकाणी सेंद्रिय उत्पादनांच्या चाचणीची सुविधा असलेल्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. चाचणीचा खर्च कमी करण्यासाठी या प्रयोगशाळांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांनी स्पष्ट केले.

यातील पहिली प्रयोगशाळा अहमदाबाद येथे उभारली जाणार आहे. इतर राज्यांत उर्वरित प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गुजरातमधील सर्व अमूल पार्लर आणि रिटेल आउटलेटवर सेंद्रिय पीठ उपलब्ध होईल. जूनपासून गुजरात, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुणे या महानगरांत ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे. एक किलो पिठाची किंमत ६० रुपये आणि पाच किलो पिठाची किंमत २९० रुपये आहे.

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणले जाईल आणि दूध संकलनाचे हेच मॉडेल सेंद्रिय उत्पादनांच्या व्यवसायातही स्वीकारले जाईल. यामुळे सेंद्रिय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, सेंद्रिय अन्न उद्योगास चालना मिळणार असल्याचा विश्वासही सोढी यांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com