विदर्भात ७ मोठे उद्योग उभारणार; डॉ. राऊत

यंदाच्या परिषदेत विदर्भासाठी खूप चांगल्या गोष्टी खेचून आणल्या आहेत. मोठमोठ्या ७ उद्योग कंपन्यांनी विदर्भात गुंतवणूक करण्याविषयी सामंजस्य करार केले आहेत.
विदर्भात ७ मोठे उद्योग उभारणार; डॉ. राऊत
Vidarbh IndustriesAgrowon

नागपूर : स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत विदर्भात सुमारे ३ हजार ५८७ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित ७ मोठे उद्योग उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार झाले आहेत. या उद्योगांची उभारणी झाल्यास ४ हजार ८०० रोजगार उपलब्ध होतील,’’ अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त समन्वय समितीतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, बुटीबोरी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, एमआयएचे अध्यक्ष सी. जी. शेगावकर, केआयएचे अध्यक्ष अमर मोहिते, व्हीआयएचे उपाध्यक्ष आर. बी. गोएंका, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, प्रादेशिक संचालक महाऊर्जा वैभव पाथोडे आदी उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सामंजस्य करार होतात, पण प्रत्यक्षात उद्योग उभारले जात नाहीत, अशी ओरड केली जाते. मात्र यंदाच्या परिषदेत विदर्भासाठी खूप चांगल्या गोष्टी खेचून आणल्या आहेत. मोठमोठ्या ७ उद्योग कंपन्यांनी विदर्भात गुंतवणूक करण्याविषयी सामंजस्य करार केले आहेत. नुसते करारच झाले नाहीत, तर त्याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. ‘इंडोरामा’ ही कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात बुटीबोरी येथे ६०० कोटींचा नवा उद्योग प्रकल्प उभारणार आहे. त्यातून १५०० कुशल मनुष्यबळासाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.

‘‘‘जीआर कृष्णा फेरो अलॉईज लिमिटेड’ ही दुसरी कंपनी पोलाद क्षेत्रात मूल, चंद्रपूरमध्ये ७४० कोटींचा उद्योग उभारणार आहेत. तिथे ७०० कामगारांना रोजगार मिळेल. ‘कलरशाइन इंडिया लिमिटेड’ या तिसऱ्या कंपनीशी ५१० कोटी रुपयांच्या उमरेड येथील प्रस्तावित पोलाद प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाला. या प्रकल्पातून ५०० रोजगार निर्माण होतील. ‘कार्निव्हल इंडस्ट्रीज’ ही चौथी कंपनी इथेनॉल इंधनाच्या क्षेत्रात मूल चंद्रपूर येथे २०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. तिथे ५०० कामगारांना रोजगार मिळेल. ‘गोयल प्रोटिन्स लिमिटेड’ या पाचव्या कंपनीत ऑइल निर्मितीमध्ये बुटीबोरी येथे ३८० कोटींची गुंतवणूक केली जाईल. या उद्योगासाठी ५३४ मनुष्यबळ लागेल,’’ असे राऊत म्हणाले.

प्रोस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा १५० कोटींचा सहावा वस्त्रोद्योग प्रकल्प अमरावतीमध्ये उभारला जाईल. त्या ठिकाणी ६०० जणांची रोजगार क्षमता निर्माण होईल. तडाली, चंद्रपूर येथे इथेनॉल इंधनाचा सुमारे १ हजार कोटी गुंतवणुकीचा सातवा प्रकल्प होईल. तिथे ६०० कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक

हरित व नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची खात्रीशीर गुंतवणूक होईल. संबंधित कंपनीकडून त्याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला असल्याची माहिती राऊत यांनी या वेळी दिली. मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रम ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये राबविण्यात येईल. लॉजिस्टिक क्षेत्रात रिलायन्स कंपनीचे पार्क आले. अदानी कंपनीने एक पार्क उभारला. दुसऱ्या पार्कसाठी जागेचा शोध सुरू आहे. भाजीपाल्याच्या व्यापारासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये ‘कोल्ड स्टोअरेज’ व्यवस्था केली जाईल. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी गोसीखुर्द धरणाचे पाणी बुलडाणा जिल्ह्यापर्यंत नेण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com