
Nashik News : सध्याच्या वातावरण बदलत असल्याने पीकपद्धती बदलण्याची गरज आहे. मात्र बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड करावी.
बदलत्या वातावरणात (Climate Change) शेतीमध्ये पिकांचे निरीक्षण करून कीड-रोग यांचे व्यवस्थापन (Pest Disease Management) योग्यवेळी होण्यासाठी एकात्मिक पद्धतीचे उपाय आवश्यक आहेत.
या माध्यमातून निसर्गाला समजून घेत खर्चात बचत शक्य होईल, असा सल्ला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाच्या (नाशिक) कीटकशास्र विभागाचे सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी दिला.
‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २१) गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील तालुका शेतकरी संघाच्या सभागृहात ‘ॲग्रोवन’ आयोजित यारा फर्टिलायझर्श इंडिया प्रा. लि. प्रायोजित ‘ॲग्रो संवाद’मध्ये ‘भाजीपाला किड रोग व खत व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्या वेळी प्रा. उगले बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शेतकरी दत्तात्रय कांडेकर अध्यक्षस्थानी होते.
तर मंडल कृषी अधिकारी श्री. जाधव, यारा फर्टिलायझर्सचे कृषी विद्यावेत्ता विकास खैरनार, कृषी पर्यवेक्षक श्री. भांड, कृषी सहायक राहुल शिंदे, सविता खाडे, तालुका आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र सोनवणे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पना पाटील, नीलिमा करतुरे, ग्रामपंचायत सदस्य मीना थेटे, राणी थेटे, यांसह सरस्वती खुर्दळ, सिंधुबाई तावडे, यारा फर्टिलायझर्स नाशिक विभागीय व्यवस्थापक केशव बरकले आदी उपस्थित होते.
प्रा. उगले म्हणाले, की जिल्ह्यात टोमॅटो लागवडी मोठ्या प्रमाणावर होत असतात. यामध्ये टॉमेटो पिकातील मर रोग नियंत्रणासाठी जैविक घटक वापरावेत. टूटा अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे, प्रकाश सापळे वापरावेत.
वेलवर्गीय भाजीपाला पिकात फळमाशीच्या नियंत्रणासाठी गंध सापळे वापरावेत. अळी वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी करंज-निम आधारित कीडनाशकांचा वापर करून रासायनिक कीडनाशक गट अदलाबदल करून वापरावेत.
मागील पंधरवड्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला लागवडीत रोगांचे प्रमाण वाढले आहे. गारपिटीच्या फटक्यात अनेक ठिकाणी टोमॅटो फाटले आहेत.
वातावरण प्रतिकूल असल्याने काही दिवसांत अशा बाधित क्षेत्रामध्ये बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शिफारशीनुसार योग्य प्रमाणात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी संतुलित खतांची गरज
भाजीपाला पिकात रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी माती परीक्षण करून त्यातील उपलब्धतेची माहिती घेणे अपेक्षित असते.
खत व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याने अन्नद्रव्यांची उपलब्धता व कमतरता हे समजून घेऊन अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी संतुलित खतांची आवश्यकता असल्याचा सल्ला यारा फर्टिलायझर्सचे विकास खैरनार यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.