
यवतमाळ ः अतिवृष्टी (Heavy Rainfall), संततधार पाऊस तसेच पूरस्थितीमुळे पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उघड्या डोळ्यांनी नुकसानीचा अंदाज येत असताना देखील पीक विमा (Crop Insurance) कंपनीकडून भरपाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत या विरोधात मुंडण आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय तांडा सुधार समिती पुसदच्या वतीने देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून हा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून हंगामात पीकविमा संदर्भाने जागृती केली जाते. त्याच्या परिणामी हजार शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र विमा संरक्षित केले. त्याकरिता निर्धारित विमा हप्ता देखील भरण्यात आला.
जिल्ह्याच्या इतर तालुक्याप्रमाणे पुसद तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान पावसामुळे झाले. मात्र याची दखल विमा कंपनीने घेतली नाही. विमा कंपनीकडून मात्र शासनाने भरपाई दिल्यानंतरही विमा परताव्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप तांडा सुधार समितीकडून करण्यात आला आहे. या प्रश्नी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पवन राठोड, पंडित पवार, दुर्गाराम महाराज, सुभाष राठोड, शैलेश सरगर, कुबिरराव मस्के, अविनाश राठोड, साहेबराव हाके, गजानन राठोड व इतरांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.