
राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : इथेनॉलचा प्रभावी वापर करण्याबाबत केंद्राने केलेल्या नियोजनामुळे इथेनॉलची ( Ethanol) वार्षिक उत्पादनक्षमता नोव्हेंबरअखेर ९४७ कोटी लिटरपर्यंत पोहोचली आहे. या कालावधी अखेर देशातील विविध पिकांवर चालणाऱ्या २८८ इथेनॉल प्रकल्पांना १८५०० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी मंजूर केले आहे. यापैकी १९६ प्रकल्पांना ९००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ट्विट करत इथेनॉलच्या क्षमता वृद्धीची माहिती दिली.
मोलॅसिस आधारित प्रकल्पाची क्षमता ६१९ कोटी लिटर तर धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांची क्षमता ३२८ कोटी लिटरची आहे. यंदाचा गळीत हंगाम देशभरात वेगात सुरू झाला आहे. कारखान्यांनी इथेनॉलच्या उत्पादनास ही प्राधान्य दिले आहे. दरम्यान, तेल उत्पादक कंपन्यांनी १३९ कोटी जादा इथेनॉलची मागणी नोंदवली आहे. यापूर्वी तेल उत्पादक कंपन्यांनी ४६० कोटी लिटरची मागणी नोंदवली होती. यंदा तेल उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त प्रमाणात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या दृष्टीने त्यांनी ऊस व अन्य धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाकडेही सातत्याने इथेनॉलची मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
यंदाही उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यावर जास्त भिस्त असणार आहे. धान्यावर आधारित इथेनॉलसाठी पूर्वेकडील राज्यावर लक्ष केंद्रित केले जाणार केले. पुढील काळात जास्तीत जास्त निर्णय इथेनॉल निर्मिती करण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. या दृष्टीने कर्जपुरवठा व इथेनॉल प्रकल्पांच्या अडचणी याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.