
Banana Market जळगाव ः खानदेशात गेले काही महिने केळीचे दर (Banana Rate) स्थिर आहेत. केळीची निर्यातही (Banana Export) वेगात सुरू आहे. परिणामी नव्याने केळी लागवडीची (Banana Cultivation) तयारी सुरू झाली आहे.
जून, जुलैमधील लागवडीच्या म्हणजेच मृग बहर केळीखालील क्षेत्र स्थिर राहील. ३७ हजार हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे.
खानदेशात मृग बहार केळीची लागवड अधिक असते. तर सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान लागवड केल्या जाणाऱ्या म्हणजेच कांदेबाग केळीची लागवड कमी असते. काही शेतकरी मे मध्येच लागवड करतात. तर अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करतात.
जुलैपर्यंत ही लागवड सुरू असते. लागवडीसाठी अनेक शेतकरी केळी रोपांना पसंती देतात. मागील वर्षी किंवा २०२१-२२ मध्ये रोपांचा कमी पुरवठा खानदेशात झाला होता. कारण लॉकडाऊन व इतर कारणांनी रोपे निर्मितीवर परिणाम झाला होता. रोपांची निर्मिती व पुरवठा अनेक स्थानिक व बाहेरील कंपन्या करतात.
त्यात मध्य प्रदेश, गुजरातमधील कंपन्यांसह जळगाव, पुणे, नगर भागातील कंपन्या पुरवठा करण्यासाठी आगाऊ नोंदणी करीत आहेत.
यंदा मागणीपेक्षा अधिक पुरवठा होईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. प्रतिरोप १४, १५ रुपये, असे दर आहेत. त्यात थेट शेतापर्यंत पुरवठा करण्याचा खर्चही गृहीत धरला जातो.
जळगावात सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवरील केळी लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग होवू शकतो. तर नंदुरबारातही हा उपयोग सुमारे दोन हजार हेक्टरसाठी होण्याची शक्यता आहे.
खानदेशात मृग बहर केळी लागवडीखालील क्षेत्र...
मृग बहार केळी लागवडीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका आघाडीवर आहे. रावेरात दरवर्षी १९ ते २० हजार हेक्टरवर मृग बहार केळी लागवड केली जाते. यंदाही एवढीच लागवड असणार आहे.
त्यापाठोपाठ यावलमध्ये सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर, मुक्ताईनगरात चार हजार हेक्टर, नंदुरबारमधील शहादा तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर आणि तळोदा, अक्कलकुवा भागात मिळून सुमारे तीन हजार हेक्टरवर मृग बहार केळीची लागवड केली जाईल, असा अंदाज आहे.
तसेच जामनेर, जळगाव, पाचोरा भागातही काही शेतकरी मृग बहार केळी लागवड करतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपुरात कांदेबाग केळी लागवड अधिक असते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.