
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः खरिपातील सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) या प्रमुख पिकांपाठोपाठ आता तुरीच्या पिकालासुद्धा बदललेल्या वातावरणाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तर पावसामुळे काढणीसाठी तयार असलेल्या तुरीच्या दर्जाला मार बसण्याची शक्यता आहे.
अशातच तुरीला बाजारात सध्या सात हजार ते साडेसात हजारांपर्यंत दर मिळत आहे. चांगल्या दर्जाची तूर आतापासूनच भाव खात आहे.
या हंगामातील तुरीची काही भागांत काढणी सुरू झाली आहे. नवीन तूर बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झाली. या तुरीला सध्या हमीभावापेक्षा अधिक दर मिळतो. देशात प्रामुख्याने तुरीचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले. तूर उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात अतिपावसाने तुरीचे नुकसान केले.
हे नुकसान सुमारे २० टक्क्यांपर्यंत आहे. तुरीचे उभे पीक बऱ्याच ठिकाणी वाळले होते. अशातच आता तुरीचा हंगाम सुरू झाला.
ही नवी तूर सध्या बाजारात चांगला दर मिळवत आहे. सोमवारी (ता. २) वाशीम जिल्ह्यात ७४७० रुपयांपर्यंत दर मिळाला. शासनाचा तुरीचा हमीभाव ६ हजार ६०० रुपये आहे.
अकोल्यात तुरीची साडेसहाशे क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. किमान पाच हजार ते कमाल ७४५० रुपयांदरम्यान दर होता. सरासरी ६९०० रुपयांचा दर तुरीला मिळाला.
महाराष्ट्र, कर्नाटकात उत्पादनात घट शक्य
अकोल्यात डाळ मिल उद्योगातील एका प्रसिद्ध उद्योजकांच्या मते या हंगामात देशातील प्रमुख तूर उत्पादक असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत पिकाच्या उत्पादकतेत घट दिसून येत आहे.
आता वातावरण बदलले असून, पाऊस झाला तर त्याचा तुरीच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. सध्या बाजारात चांगला माल ७३०० ते ७५०० पर्यंत विकला जात आहे. हलका मालाचा दरही सहा हजारांपासून सुरू आहे. डाळ मिल उद्योगाला तुरीची गरज भासू शकते.
शासनाने तुरीची आयात खुली केल्याने आफ्रिका व ब्रह्मदेशातून लेमन तुरीची आयात वाढून ही गरज पूर्ण होईल. एकूणच सध्याची स्थिती पाहता तुरीला चांगला दर मिळेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.