
Arrest In Bribe सिन्नर, जि. नाशिक : पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना नोटीस बजावण्यासाठी लाच मागणाऱ्या सिन्नर येथील सहकार विभागाच्या (Cooperative Department) सहायक निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. २) दुपारी पंधरा हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना पकडले.
एकनाथ प्रताप पाटील असे या लाचखोर सहायक निबंधकाचे नाव आहे. तालुक्यातील पतसंस्थेकडून थकीत कर्जदारांना कर्जवसुलीची नोटीस बजावण्यासाठीचे (कलम १०१) दाखले उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात सहायक निबंधक पाटील यांनी १७ प्रकरणांत प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रमाणे लाचेची मागणी केली होती.
त्यामुळे तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाशी संपर्क साधल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ठरलेल्या साडेपंचवीस हजार रुपयांपैकी रोख साडेपंधरा हजार रुपये पाटील यांनी स्वतःच्या कार्यालयात स्वीकारले. यादरम्यान दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक संदीप साळुंके, सहायक फौजदार सुखदेव मुरकुटे, हवालदार पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे.
गुरुवारी अर्ज माघारीचा दिवस होता. पाटील या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. त्यामुळे सकाळपासूनच सहायक निबंधक कार्यालयाच्या परिसरात निवडणूक अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांची व त्यांच्या समर्थकांची गर्दी होती.
या गर्दीतच पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारली अन् ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. या घटनेमुळे सिन्नर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.