टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ

तापमान वाढ, कीड-रोगांमुळे उत्पादनावर परिणाम; आवक घटली
टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ
tommetoagrowon


नाशिक : सध्या टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे आवकेत अस्थिरता असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत १ हजार क्विंटलने आवक कमी झाल्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून आले. त्यामुळे दराने उसळी घेतली असून ते दुप्पट झाले आहेत. त्यामुळे सध्या टोमॅटोची लाली खुलल्याचे पाहायला मिळत आहे.
मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्णतेमुळे झाडांना सुकवा येऊन फुलगळ होण्यासह फळधारणा अवस्थेत अडचणी आल्याने उत्पादनात घट आली आहे. शिवाय मर, सूत्रकृमी या रोगांसह फळमाशी, टुटा व लालकोळीचा प्रादुर्भाव झाल्याने एकूण लागवडीपैकी ७० टक्के क्षेत्रावर उत्पादनाला फटका बसला आहे.
राज्यातील नारायणगाव, संगमनेरसह जिल्ह्यातील अभोणा (ता. कळवण) दोडी, पांढुर्ली, दापूर(ता. सिन्नर) व इगतपुरी तालुक्यातील दौंडत, कचरगाव, तळोशी, धामणी, मुरमी, वैतरणा या भागांत लागवडीवर परिणाम होऊन उत्पादन घटल्याने आवकेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. तर सटाणा तालुक्यातील लागवडी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २०) उच्चांकी ६ हजार ३७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर ४ हजार २५० रुपये राहिला.
गेल्या आठवड्यात आवक स्थिर होती, मात्र १७ मेनंतर आवक कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आठ दिवसांत टोमॅटोच्या दरात तेजी येऊन ते दुप्पट झाले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. गेल्या दीड महिन्यापासून दरात कायम सुधारणा दिसून आली. उन्हाळ्यात दर तिसऱ्या दिवशी एकरी प्रतितोड्याला सरासरी १२०० क्रेट टोमॅटो निघतात; मात्र साध्य ते निम्म्यावर आले असून, ५०० ते ६०० क्रेट उत्पादन मिळत आहे. दरात सुधारणा दिसून येत असली तरी अनेक उत्पादनावर परिणाम झाल्याने काहीशी नाराजी आहे. एकंदरीतच टोमॅटो दराचे गणित निसर्गावर अवलंबून आहे.


आवक कमी होण्याची प्रमुख इतर करणे :
- सध्या इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये पाणी असल्याने गाळपेऱ्यातील लागवडी कमी
- मागील वर्षी दर नसल्याने तुलनात्मक लागवडीत घट
- कीड, रोग व तापमानवाढ यामुळे उत्पादनावर परिणाम

------------

गेल्या सप्ताहातील दरस्थिती :
वार...आवक...किमान...कमाल...सरासरी (रुपये)
२० मे...३ हजार ५०४...४००...६ हजार ३७५...४ हजार २५०
१९ मे...३ हजार २५२...४००...४ हजार ७५०...३ हजार
१८ मे...३ हजार ५०७...४००...४ हजार...२ हजार ५००
१७ मे...५ हजार १९६...४००...३ हजार ८००...२ हजार २५०
१६ मे...५ हजार ३८०...४००...३ हजार ५००...२ हजार ५०
१४ मे...५ हजार १२...३७५...३ हजार ५००...२ हजार
१३ मे...४ हजार ६४...३५०...३ हजार ३७५...२ हजार
१२ मे...४ हजार ७०२...३५०...३ हजार ५००...१ हजार ८७५

मालाची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्याने पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उठाव मोठ्या प्रमाणावर आहे. स्थानिक बाजारासह वाशी सारख्या बाजारात माल कमी असल्याने दरात तेजी कायम आहे.

संतोष फडोळ, टोमॅटो व्यापारी व उत्पादक, मुंगसरा, ता. जि. नाशिक

उष्णता वाढल्याने म्हणावे तशा लागवडी तयार झाल्या नाहीत. करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे उत्तम नियोजन करून ४० टक्क्यांवर उत्पादन घटले. परिसरातील टोमॅटो उत्पादकांचे नुकसान आहे. त्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पिकावर ताण पडला आहे.

रोहिदास नानाजी जाधव, टोमॅटो उत्पादक, अंतापूर, ता. सटाणा --

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com