
बाळासाहेब पाटील
Agriculture Loan Supply मुंबई : शेतकऱ्यांना पीक कर्जवितरणासाठी (Crop Loan) राष्ट्रीयीकृत बँकांनी (Nationalize Bank) सीबील सक्ती केल्याने जानेवारीअखेर ५४ टक्के रब्बी पीक कर्ज वितरित झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे कर्जवितरण करत असल्याने राज्य सरकारही यात हस्तक्षेप करू शकले नसल्याची स्थिती आहे. यंदा १६ लाख ७७५ कोटींपैकी आठ हजार ६२२ कोटी रुपये कर्जवितरण (Loan Supply) झाले आहे.
यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी नाबार्डने ८० हजार ७६४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. तर राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत राज्यासाठी ६१ हजार ७६६ कोटी रुपये पीक कर्जवितरणाचे लक्ष्य होते. त्यापैकी खरीप हंगामासाठी ४५ हजार ९१ कोटी तर रब्बीसाठी १६ हजार ७७५ कोटींचे लक्ष्य होते. यापैकी खरिपात ३८ हजार ८०६ कोटींचे कर्ज ४२ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना दिले.
यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवितरण आठ जिल्ह्यांमध्ये झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५९ टक्के, गोंदियात ६७ टक्के, नागपूरमध्ये ४६ टक्के, वाशिममध्ये ३९ टक्के, हिंगोलीत ५७ टक्के, नंदुरबारमध्ये ५४ टक्के, नाशिकमध्ये ६५ तर पालघरमध्ये सर्वात कमी २३ टक्के कर्जवितरण झाले आहे.
तरीही २०२०-२१ च्या तुलनेत १३ टक्के जास्त कर्जवितरण झाल्याची सहकार विभागाची आकडेवारी सांगते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी येथेही हात आखडता घेत एकूण लक्षांकापैकी ५७ टक्के शेतकऱ्यांना ७१ टक्केच कर्जवितरण केले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांना २५ हजार ७७७ कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १८ हजार २५० रुपयांचे कर्जवितरण केले आहे.
रब्बी हंगामात जानेवारीअखेर ८ हजार ६६२ कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले आहे. यामध्ये जिल्हा बँकांचीही गती संथ आहे. या बँकांना ५ हजार २६२ कोटी रुपयांचे, राष्ट्रीयीकृत बँकांना १० हजार ६०८ कोटींचे लक्ष्य दिले आहे.
त्यापैकी जिल्हा बँकांनी १८३६ तर राष्ट्रीयीकृत बँकांनी ६३६६ कोटी रुपयांचे पीक कर्जवितरण केले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बँकांनी केवळ ४० टक्केच कर्जवितरण केले आहे.
१८ बँकांचा शून्य टक्के कर्जपुरवठा
शेतकऱ्यांना जिल्हा बँकांसह खासगी, व्यापारी, लघुवित्त आणि ग्रामीण बँकांनी पीक कर्जपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, कर्नाटक बँक, इंडसहंट बँक, डीसीबी, युको, कोटक महिंद्रा यांसह तब्बल १८ बँकांनी रब्बीचा कर्जपुरवठाच केलेला नाही.
कर्जवितरणात युनियन बँक आघाडीवर
यंदाच्या रब्बी हंगामात कर्जवितरणात युनियन बँकेने ८९ टक्के, एसबीआयने ४८ टक्के, पंजाब नॅशनल बँकेने ४७ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्रने ४५ टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकेने ३४ टक्के, बँक ऑफ इंडियाने ३१ टक्के, कॅनरा बँकेने ३० टक्के कर्जपुरवठा केला आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सीबील सक्ती करू नये, असे निर्देश देण्याबाबत सरकार विभागाने राज्यस्तरीय बँकर्स समितीला पत्र दिले होते. मुळात या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार कर्जवितरण करतात. त्यामुळे राज्यसरकारने समितीला पत्र लिहून त्यात शिथीलता आणावी, अशी विनंती केली आहे.
- अनुप कुमार, अप्पर प्रधान सचिव, सहकार.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.