
Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यांतर्गत येत असलेल्या गोळेगाव येथे गुरुवारी (ता. २०) रात्री झालेल्या शेतकऱ्यांच्या कीर्तनातून कृषी ज्ञानाचा (Agriculture Knowledge) जागर करण्यात आला.
कृषी विषयाचे अभ्यासक व शेतकरी उदय देवळाणकर (Uday Deolankar) यांनी भारतीय शेती पद्धती आणि कृषीची चुकलेली वाट याविषयी ग्रामस्थांचे विविध उदाहरणासह प्रबोधन केले.
पीक पद्धती कशी असावी, कीड रोगांच नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल, शेती पद्धतीत वापरली जाणारी अवजारे व त्यांचे महत्त्व आदींच्या इतिहासाचा उलगडा या प्रबोधनातून करण्याचा प्रयत्न श्री. देवळाणकर यांनी केला.
गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून गुरुवारी शेतकऱ्यांचे कीर्तन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रास्ताविकातून ‘शेतकऱ्याच कीर्तन’ आयोजनामागील भूमिका गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी यांनी विशद केली.
उदय देवळाणकर यांनी कृषिविषयक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व अध्यात्म याची सांगड घालून आपल्या देशातील पूर्वापार चालत आलेल्या शेती पद्धतीची व त्या पद्धतीने शेती केल्यास होणाऱ्या फायद्याची इत्थंभूत माहिती उदाहरणासह ग्रामस्थांना पटवून दिली.
या कार्यक्रमासाठी गोळेगाव येथील चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, हस्त नक्षत्र पुरुष शेतकरी गट, मृग नक्षत्र पुरुष शेतकरी गट (ट्रॅक्टरवाले), व पुष्य नक्षत्र महिला शेतकरी गट आदी सर्व गटातील सदस्य उपस्थित होते.
कीर्तन आटोपल्यावर सर्वांनी गावातून भगवती मातेचे मंदिरापर्यंत टाळ-मृदंगाचा गजर करत दिंडीत सहभाग घेतला.
कीर्तनात ऐकलेले सर्व काही बरोबर घेऊन त्यावर सकारात्मक विचार करत घरी जात तोच पवित्र विचार करत आपल्या धरणीमातेला, निसर्गाला, पर्यावरणाला, समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला.
आम्ही गोळेगावकर एकी हेच आमचं बळ, या नाऱ्याने शेतकरी कीर्तनाचा समारोप झाला. या वेळी प्रकाश वाकळे, कृषिमित्र पत्रकार विजय चौधरी, एमजीएम कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ तुषार चव्हाण व श्री. मुंढे, दीपक सोळंके, स्वप्नील घरमोडे, सौरभ पाटील, प्रा. राजेश पाटील, ॲड. अविनाश औटे, ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुनील दाभाडे, जाहिरात विभागाचे दत्तात्रय सहाणे आदींची उपस्थिती होती.
ॲग्रोवनच्या अंकाचेही केले स्वागत..
गुरुवारीच ॲग्रोवन चा अठरावा वर्धापन दिन राज्यभरात विविध उपक्रमाने साजरा होत असताना गोळेगावच्या ग्रामस्थांनीही या वर्धापन दिनी निघालेल्या विशेषांकाचे भरभरून स्वागत केले.
ॲग्रोवन मधून गावाच्या एकूणच विकास कार्याची यशोगाथेच्या माध्यमातून दखल घेतल्यानंतर ऊर्जा मिळाल्याची भावनाही ग्रामस्थांनी बोलून दाखविली. यावेळी ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी ॲग्रोवनची भूमिका विशद केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.