
Wardha News : मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana ) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले.
दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.३) झाले.
त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे यांच्यासह दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटनप्रसंगी सर्वसामान्यांना या यंत्रणेचा कशाप्रकारे लाभ होणार याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
अशा प्रकारे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेचा त्यांनी पुनरुच्चार करीत जास्तीत जास्त लोकांना दैनंदिन आजारांसाठी प्रभावीपणे या दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांनी अगदी विपरीत परिस्थितीत आरोग्य सेवेची सुरुवात केली. त्यांचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे.
महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या भूमीत रुग्णसेवेचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी पुढे सुरू ठेवला आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत.
संस्थेचे रुग्णसेवेबरोबरच शिक्षणकार्यही सुरू आहे. कोरोना काळातही संस्थेने कौतुकास्पद काम केले असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. कार्यक्रमाचे आभार आमदार समीर मेघे यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.