
जळगाव ः खानदेशात जुलै व ऑगस्टमध्ये लागवडीच्या (Banana Cultivation) बागांत कुकुंबर मोझॅक (Banana Cucumber Mosaic) विषाणूने (सीएमव्ही) कहर केला. यात मोठे नुकसान होऊन पीक काढावे लागले. पीक काढलेल्या क्षेत्रात सध्या उशिराच्या कांदेबाग केळीची लागवड सुरू आहे.
रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा हा भाग नवती किंवा मृग बहर (मे ते ऑगस्टदरम्यान लागवडीच्या बागा) केळीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात अपवादानेच सप्टेंबर ते डिसेंबर या काळातील केळी बागा म्हणजेच कांदेबाग केळीची लागवड केली जाते. परंतु सीएमव्हीमुळे ज्या शेतकऱ्यांना या भागात केळी बागा काढाव्या लागल्या, त्या क्षेत्रात सध्या केळी लागवड सुरू आहे.
उशिराच्या कांदेबाग केळीमध्ये ही लागवड गणली जाते. अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग, अनुभव यासाठी उशिराच्या कांदेबाग केळीची लागवड केली आहे. त्यासाठी केळीची उतिसंवर्धित रोपांचा वापर अधिक सुरू आहे. सुमारे चार ते पाच हजार हेक्टरवर या उशिराच्या कांदेबाग केळीची लागवड खानदेशात होईल, असे दिसत आहे.
केळीचे दर टिकून आहेत. इतर सर्व भाजीपाला, कापूस पिकाचे दर हवे तसे नाहीत. कलिंगड लागवडही वाढली आहे. ही बाब लक्षात घेता केळीला संबंधित शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
कांदेबाग केळीसाठी खानदेशात जळगावमधील चोपडा, जळगाव, यावलचा काही भाग, जामनेर, भडगाव, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर हा भाग प्रसिद्ध आहे. पण या केळीची लागवड आता मुक्ताईनगर, यावल, रावेर, नंदुरबारमधील शहादा भागातही केली जात आहे.
रावेर व मुक्ताईनगरात मागील हंगामातही काही शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीची लागवड केली होती. या केळीला मागील व सरत्या हंगामातही चांगले दर मिळाले होते. यामुळे कांदेबाग केळी रावेर, मुक्ताईनगर भागातही वाढू लागल्याचे चित्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.