नियोजन आणि तंत्रज्ञानाद्वारे आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हावे

राज्यात गेल्या वर्षी १३५० लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली. त्यामुळे कारखान्यांनी विक्रमी गाळप केले आहे. मात्र यंदादेखील जादा ऊस राहील. त्यामुळे तोडणी व हार्वेस्टरचे आतापासूच काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
नियोजन आणि तंत्रज्ञानाद्वारे आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हावे
Sugar IndustryAgropwon

पुणेः राज्यस्तरीय साखर परिषदेच्या माध्यमातून भविष्यातील आव्हाने व संधीचा उत्कृष्ट मागोवा घेतला गेला आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीत मोठी भूमिका बजावणाऱ्या आता साखर कारखान्यांनी उत्तम नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ‘व्हीएसआय’च्या वतीने करण्यात आले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) मांजरी येथील मुख्यालयात दोन दिवसांपासून भरवलेल्या साखर परिषदेचा समारोप रविवारी (ता. ५) झाला. या सोहळ्यात ऊसभूषण पुरस्कारांसह व्हीएसआयचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरित करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, साखर आयुक्त गायकवाड, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, संचालक संभाजी कडू पाटील, नियामक मंडळाचे संचालक गणपतराव तिडके, नॅशनल हेव्ही इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, विशाल पाटील, राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे व व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्रकाश आवाडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विजयसिंह मोहिते पाटील, नरेंद्र घुले पाटील, साखर उद्योजक नरेंद्र मुरकुंबी होते.

‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समारोपपर भाषणात सांगितले, की राज्यस्तरीय साखर परिषद घेण्याची संकल्पना शरद पवार यांची होती. त्यानिमित्ताने आपण भविष्यातील आव्हाने व उपायांचा यशस्वी मागोवा घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसाठी ही परिषद दिशादायक ठरेल. राज्यात गेल्या वर्षी १३५० लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली. त्यामुळे कारखान्यांनी विक्रमी गाळप केले आहे. मात्र यंदादेखील जादा ऊस राहील. त्यामुळे तोडणी व हार्वेस्टरचे आतापासूच काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

राज्यातील ऊस लागवड कमी होणार नसल्याने साखरेचे उत्पादन कमी करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला. तसेच उसाचा रस, पाक, सी आणि बी हेव्ही मळीपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार करण्याचा संकल्पदेखील परिषदेच्या निमित्ताने साखर उद्योगाने व्यक्त केला. या वेळी पवार यांच्या हस्ते रसराज, एफआरपी कार्यपद्धती, इथेनॉल निर्मिती व एफआरपीवर होणारे परिणाम या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या टिप्सः

  • गुणवत्तापूर्ण साखर उत्पादन गरजेचे

  • उपपदार्थांसह हरीत हायड्रोजनसाठी संशोधन

  • नव तंत्राचा बचत करून ऊर्जा बचत करावी

  • सांडपाणी प्रक्रियेसाठी आधुनिक तंत्र वापरावे

  • ठिबक तंत्र, शुद्ध बेण्याचा वापर वाढवावा

  • क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सुपीकता कार्यक्रम राबवा

  • खर्च कमी करून उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत

साखर परिषदेत वितरित करण्यात आलेले प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय ‘ऊसभूषण पुरस्कार’

२०२०-२१ हंगामासाठीः

सातारा जिल्ह्यातील श्रीमती विमल धोंडिराम पवार यांना पूर्वहंगामी गटात, लातूर जिल्ह्यातील विश्‍वनाथ धोंडिबा होळसंबरे यांना सुरू गटामध्ये; तर यांनी खोडवा गटात सांगलीचे सौ. सुलोचना मोहनराव कदम यांना प्रथम क्रमांकाचा ‘ऊसभूषण पुरस्कार’ देण्यात आला. राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार सांगलीच्या डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला देण्यात आला.

२०१९-२० हंगामासाठीः

उत्पादक शेतकरी प्रकाश विलास जाधव (जि. कोल्हापूर) यांना पूर्वहंगामी गटात, कै. सुरेश कृष्णा साळुंखे (जि. सांगली) यांना सुरू गटामध्ये मिळालेला पुरस्कार त्यांच्या नातेवाइकांना; तर अशोक हिंदुराव खोत (जि. सांगली) यांनी खोडवा गटात प्रथम क्रमांकाचा ‘ऊसभूषण पुरस्कार’ देण्यात आला. राज्यातील सर्वोत्कृष्ट आसवानी पुरस्कार नगरच्या अंबालिका शुगरला देण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com