भारतीय किसान युनियनला फुटीचे ग्रहण

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटवीत तीन कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या भारतीय किसान युनियनमध्येच दुफळी निर्माण झाली आहे.
Rakesh Tikait
Rakesh TikaitAgrowon

नागपूर ः कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटवीत तीन कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या भारतीय किसान युनियनमध्येच दुफळी निर्माण झाली आहे. नरेश टिकैत यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हटविण्यात आल्याचा दावा एका गटाने केला आहे. तर आम्हीच काही असंतुष्टांना संघटनेतून बरखास्त केल्याचे टिकैत यांनी सांगितले.

दरम्यान या वादातून भारतीय किसान युनियन (अराजकीय) ही नवी संघटना अस्तित्वात आली असून त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश सिंह चौहान असणार आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात बंडाचे निशान फडकविण्यात आले होते. तब्बल वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करून भाकियूने केंद्र सरकारला झुकायला लावत कायदे मागे घेण्याची घोषणा झाली.

या आंदोलनाच्या माध्यमातूनच भाकियू देशभरात चर्चेचा विषय झाली. त्यातूनच देशभरातील शेतकऱ्यांना एकसंघ प्रयत्नातून युनियनचे राष्ट्रीय प्रवक्‍ते राकेश टिकैत यांनी देशभरात भ्रमण केले. महाराष्ट्रातही त्यांनी शेतकऱ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. आता त्याच संघटनेत दुफळी निर्माण झाल्याने संघटनेच्या वाटचालीविषयी साशंकता व्यक्‍त केली जात आहे. शेतकऱ्यांचे नेते महेंद्रसिंह टिकैत यांच्या ११ व्या पुण्यतिथी दिनालाच दोन गटांत भारतीय किसान युनियन विभागली गेली आहे. लखनौच्या ऊस संशोधन संस्थेच्या सभागृहात राष्ट्रीय अध्यक्ष नरेशसिंह टिकैत व राकेश टिकैत यांच्या संघटनेतून बरखास्तीची घोषणा करण्यात आली. नवी भारतीय किसान युनियन (अराजकीय) स्थापन करण्यात आली आहे.त्याचे अध्यक्ष राजेश सिंह चौहान असतील.

असा आहे इतिहास

भारतीय किसान युनियनची स्थापना १ मार्च १९८७ रोजी महेंद्र सिंह टिकैत यांनी केली होती. राजकारणापासून अलिप्त असे हे शेतकऱ्यांचे संगठण असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. स्थापना दिवसालाच करमूखेडी वीज केंद्रावर धरणे देण्यात आले. यावेळी हिंसाचार झाला व शेतकरी आंदोलन उग्र झाले. पीएसीचा एक शिपाई तसेच एका शेतकऱ्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. पोलिसांचे वाहन जाळण्यात आले. त्यानंतर कोणत्याच तोडग्याविना हे आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च १९८७ रोजी भारतीय किसान युनियनची पहिली बैठक झाली. त्यावेळी शेतकऱ्यांचे हे अजराकीय संघटन असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर उत्तरप्रदेशात अनेक मुद्यांवर भाकियूकडून आंदोलन झाली.

संघटनेत चुकीची कामे करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान, महासचिव अनिल तालान, प्रदेश उपाध्यक्ष हरिनाम वम्रा, मांगेराम त्यागी, दिगंबर सिंह, धर्मेंद्र मलिक, राजबीर सिंह यांना बरखास्त केले आहे. आमच्या संघटनेची वाटचाल पूर्वीप्रमाणेच अराजकीय राहणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आम्ही लढत राहू.
राकेश टिकैत, राष्ट्रीय प्रवक्‍ते, भारतीय किसान युनियन
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करण्यास सांगण्यात आले होते. हे शेतकऱ्यांचे अराजकीय संगठन आहे? त्यामुळे नरेश व राकेश टिकैत यांच्या बरखास्तीचा निर्णय कार्यकारिणीने सर्वानुमते घेतला आहे.
राजेश सिंह चौहान, नेते, भारतीय किसान युनियन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com