
Nagpur News संत्र्यानंतर भिवापुरी मिरची (Bhivapuri Chili) ही विदर्भाची ओळख आहे. भौगोलिक मानांकनामुळे या मिरचीचे स्वतंत्र अस्तित्वही अधोरेखित झाले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मिरचीच्या उत्पादकता वाढीचा पर्याय देण्यात कृषी विद्यापीठ अपयशी ठरल्याने भिवापुरी मिरचीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. (Latest Agriculture News)
नागपुरी संत्रा हा विदर्भाची ओळख. रंग आणि चवीच्या बाबतीत वेगळेपण जपत असल्याने टेबल फ्रूट म्हणून या फळाला जागतिकस्तरावर मान्यता आहे. या वैशिष्ट्यामुळेच नागपुरी संत्र्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
नागपुरी संत्र्यानंतर याच विदर्भाच्या मातीत भिवापुरी मिरची देखील वैशिष्ट्य जपणारी आहे. त्यामुळेच या मिरचीला देखील भौगोलिक मानांकन मिळाले आहे. २५ वर्षांपूर्वी २ ते ३ हजार एकरांवर भिवापुरी मिरचीची लागवड होत होती.
त्यानंतर मिरचीमध्ये संकरित वाण आल्याने शेतकरी भिवापूरीपासून दुरावले. इतर वाणांपेक्षा भिवापुरी लाल मिरचीला ५० रुपये जास्त मिळतात. परंतु अशा ग्राहकांची संख्या जेमतेम आहे. त्यामुळेच या मिरचीचा बाजार उठला. देशभरातून मागणी असलेल्या या मिरचीच्या दिल्लीसह देशाच्या विविध भागातील व्यापारी खरेदीसाठी थेट भिवापूरात डेरेदाखल होत होते.
भिवापुरी मिरचीची नखी खुडत ती देशांतर्गंत बाजारपेठेत पाठविली जात होती. यातून हजारो मजुरांना रोजगार मिळत होता. परंतु या मिरचीची उत्पादकता एकरी अवघी वीस क्विंटलवर आली. उत्पादकता, उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी संकरित मिरची वाणांचा पर्याय निवडला. यातूनच भिवापुरी मिरचीचे क्षेत्र १०० एकरापूरते मर्यादित झाले आहे.
असे आहे लागवड व्यवस्थापन...
जुलै, ऑगस्ट महिन्यात लागवड होते. काढणी डिसेंबरपासून सुरू होते. दर १५ दिवसांनी तोडा होतो. पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांकडे एप्रिलपर्यंत हे पीक घेता येते.
पहिल्यांदा मिळाले मोठे ग्राहक
महाराष्ट्र मार्केटिंग को-ऑपरेटीव्ह फेडरेशनकडून पहिल्यांदाच भिवापुरी मिरची पावडरची तीन क्विंटलची खरेदी करण्यात आली. ३५० रुपये किलोप्रमाणे मिरची पावडर आणि चार किलो पॅकिंग खर्च याप्रमाणे दर देण्यात आला. भिवापूर मिरची उत्पादक समूह गट (चिखलापार, ता. भिवापूर, जि. नागपूर) यांना हे कंत्राट देण्यात आले होते.
संशोधन अधांतरी
कृषी विद्यापीठाकडून या मिरचीवर संशोधन करण्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु हे संशोधनकार्य गेल्या सात वर्षांत तसूभरही पुढे सरकले नाही. परिणामी अनेक वैशिष्ट जपणारे हे मिरची वाण येत्या काळात नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.