
Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यातील मोसंबीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ प्रकल्पाचे शुक्रवारी (ता. १९) महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.
मराठवाड्यातील लिंबूवर्गीय खास करून मोसंबी पिकाच्या संशोधनाला गती मिळण्याच्या दृष्टीने जवळपास ३९ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपये खर्चाच्या या सिट्रस इस्टेट प्रकल्पाचे विशेष महत्त्व आहे. ‘रोहयो’ फलोत्पादनमंत्री भुमरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
त्याचा परिपाक म्हणून शासनाच्या कृषी व पदम विभागाने पैठणी येथील ज्ञानेश्वर उद्यानात सिट्रस इस्टेट स्थापनेला १३ जानेवारी २०२२ रोजी मंजुरी दिली होती. परंतु त्या ठिकाणची जागा सिट्रस इस्टेटसाठी अपुरी पडत असल्याने नव्याने ६ मार्च २०२३ रोजी इसारवाडी (ता. पैठण) येथील गट नंबर ८५ व ८७ मधील २२.५० हेक्टर क्षेत्रावर सिट्रस इस्टेट स्थापनेला शासनाने नव्याने मंजुरी दिली होती. त्या कामाला आता गती मिळणार आहे.
शुक्रवारी सिट्रस इस्टेटच्या होणाऱ्या भूमिपूजन समारंभाला कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, फलोत्पादन संचालक कैलास मोते, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख सिट्रस इस्टेट इसारवाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कार्ले, लीड बँक मॅनेजर मंगेश केदार, कृषी उद्योग विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक चव्हाण, जिल्हा पणन अधिकारी संध्या पांडव, महाऑरेंज प्रतिनिधी संचालक रवींद्र बोरकर, सिट्रस इस्टेटचे संचालक नंदलाल काळे, भीमराव डोंगरे, डॉ. भगवानराव कापसे, डॉ. अंकुश लघाने व जगन्नाथ दुधे आदींची ही उपस्थिती राहणार आहे.
सिट्रस इस्टेटचे ध्येय
- निर्यात क्षम फळबागांची वाढ करणे
- प्रतिहेक्टरी ३० टनांपर्यंत उत्पादकता वाढवणे
- गुणवत्तापूर्वक रोपांची निर्मिती करणे
- आदर्श रोपवाटिकांची स्थापना करणे
- काढणीतर व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा तयार करणे
- यांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देणे
...अशी असेल रचना
- सेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी)... ४.५० हेक्टर
- सिट्रस इस्टेट इसारवाडी क्षेत्र... १८ हेक्टर
- जायकवाडी बॅक वॉटर खालील क्षेत्र... ७.५० हेक्टर
- प्रत्यक्ष बारमाही वैतीखालील क्षेत्र... १०.५० हेक्टर
- बांधकाम क्षेत्र... दोन हेक्टर
- शेडनेट व पॉलिहाउस... २.५० हेक्टर
- मातृक्ष लागवड क्षेत्र... दोन हेक्टर
- मूलकांड रोपवाटिका क्षेत्र.. एक हेक्टर
- रस्त्यासाठी क्षेत्र.. ०.५० हेक्टर
- उर्वरित क्षेत्र इतर बाबींसाठी.. २.५० हेक्टर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.