
नागपूर ः भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आपले आश्वासन पाळले नाही, असा उल्लेख करणे पद्मश्री पुरस्कार विजेत्या व देशाच्या बीजमाता राहीबाई पोपेरे (Beejmata Rahibai Popere) यांना चांगलेच महागात पडले.
इंडियन सायन्स काँग्रेसच्या (Indian Science Congress) मंचावर उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांकडून ‘आता पुरे झाले’ असे म्हणत त्यांचे भाषण अर्ध्यावरच रोखण्यात आले. गुरुवारी (ता. ५) सायंकाळी फार्मर्स सायन्स काँग्रेसनंतर (Farmer Science Congress) आयोजित वुमन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात हा प्रकार घडला. त्यानंतर हा कार्यक्रम ‘देशाचा की भाजप पक्षाचा’ अशी चर्चा आता रंगली आहे.
Rahibai
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात राहीबाई पोपेरे यांच्या अध्यक्षतेत फार्मर सायन्स काँग्रेसचे उद्घाटन गुरुवारी (ता. ५) पार पडले. त्यानंतर सायंकाळी महिला सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन सोहळ्याला देखील त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
व्यासपीठावर नागपूर विद्यपीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, भाजपप्रणीत शिक्षक मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार डॉ. निशा मेंदिरट्टा भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना उपस्थित होत्या.
राहीबाई पोपेरे भाषणात म्हणाल्या, की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा भेटली. पहिल्या भेटीत त्यांनी माझे गाव कोंभलने (जि. अहमदनगर) येथे येण्याचे आश्वासन दिले होते. या भेटीत ते माझे पर्यावरण व बीज संरक्षणविषयक काम पाहणार होते. त्यानंतर २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी मी राष्ट्रपती भवन येथे गेली. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांची दुसऱ्यांदा भेट झाली.
त्या वेळी मी त्यांना चर्चेदरम्यान तुम्ही माझ्या गावी येण्याचे आश्वासन दिले होते; मग आले का नाही अशी थेट विचारणा केली. त्यावर दोन वर्षे कोरोना असल्यामुळे शक्य झाले नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बियाणे संवर्धनाच्या कामातून माझ्या गावाला आंतरराष्ट्रीयस्तरावर ओळख मिळाली आहे.
मात्र त्यानंतर देखील कोंभलने गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते, वीज, पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची पूर्ततादेखील गावात झालेली नाही, असे राहिबाईंनी म्हणताच डॉ. कल्पना पांडे यांनी त्या भाषण करीत असलेले ठिकाण गाठत त्यांना आता पुरे असे सांगत त्यांचे भाषण थांबविले.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांना आपली भूमिका मांडता येत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असावी? सध्या सरकारविरोधी बोलणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ ही नीती वापरली जात आहे. त्याच्या जोडीलाच देशातील सर्व शासकीय संस्था, यंत्रणा जणू भाजपच्याच आहेत असे चित्र उभे करण्यात आले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही मूल्यांचा ऱ्हास भाजपने केला आहे.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.