
नाशिक : मातोरी गावाच्या गायखोऱ्यात गुरुवारी (ता. ९) दुपारी वणवा लागल्याची घटना घडली. या वणव्यात गायरानातील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले. या आगीत मात्र जैवविविधता व वन्यजीव, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे नुकसान झाले.
प्रामुख्याने वणवा हा मातोरी शिवाराकडून लागत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वणवा लागल्याची माहिती कळताच वृक्षवल्ली फाउंडेशनचे तुषार पिंगळे, दरीआईमाता वृक्षमित्र परिवाराचे शिवाजी धोंडगे, वृक्षमित्र भारत पिंगळे, दीपक खोडे, समाधान जाधव, सोमनाथ खाडे यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा विझवला. त्यामुळे वन क्षेत्रात वणवा पसरला नाही. त्यामुळे मोठी हानी टळली.
वणव्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. मागीलवर्षी नाशिक जिल्ह्यात १९ ठिकाणी वणवा लागला होता. त्यामध्ये १४ वणवे विझवण्याचे काम शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन, दरीआईमाता वृक्षमित्र परिवार यांनी केले होते.
वन विभागाच्या वतीने स्थापन झालेल्या वन व्यवस्थापन समित्या फक्त कागदावरच आहेत. त्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नसल्याने स्थिती आहे.
त्यामुळे वणव्याची माहिती मिळताच आम्ही विझविण्यासाठी जात असतो. येथे जनावरांच्या चराईसाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्याचे व गवताचे नुकसान आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ यांनी
सांगितले.
वणव्याच्या घटना दिवसागणिक वाढत असून अजूनही याबाबत व्यापक जागृती नसल्याने तसेच वणवा लावणारे मोकाट असल्याने मातोरी गायखोऱ्यात पुन्हा आग लागली. माहिती कळताच आम्ही मोठ्या कष्टाने आग विझवली.
वणवा लागल्यास स्थानिक ग्रामपंचायत व गावागावातील वनव्यवस्थापन समित्यांना याबाबत माहिती द्यावी. याबाबतीत तरी वनव्यवस्थापन समितीला वणवा विझवण्याचे प्रशिक्षण द्यावे. वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेऊन हे प्रकार रोखण्यासाठी जाळपट्टे हा पर्याय आहे.
- तुषार पिंगळे, वृक्षमित्र
जैविविधततेच्या नुकसानीला जबाबदार कोण?
यंदाही वनव्याच्या घटना घडत असून रोहिला गावामागे तसेच मातोरी गायरानात हा वणवा लागला. गावठाण शिवारात ही घटना घडत असल्याने वन वणवा व्यवस्थापन समिती स्थापन करून जानेवारी महिन्यात जाळपट्टे तयार केले तर नुकसान कमी होईल.
वन विभागाच्या वतीने जाळपट्टे तयार करावेत, असे आदेश आहेत; मात्र त्यावर कार्यवाही होताना दिसून येत नसल्याने जैविविधतेच्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
वणवा लागण्याच्या घटनांची अजूनही समाजात जागृती नाही. दरवर्षी आम्ही वणवे विझवतोय प्रसंगी जीव धोक्यात टाकून हे काम करतो; मात्र यासाठी व्यापक नियोजन ग्रामपंचायती, वन विभाग यांनी केले पाहिजे. आम्ही कित्येक निवेदने दिली; मात्र अजूनही साधने, साहित्य आम्हाला मिळाले नाही.
- शिवाजी धोंडगे, वृक्षमित्र
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.